मुंबई : महापुरामुळं कोल्हापूर आणि सांगलीतली परिस्थिती हाताबाहेर गेलीय. चार चार दिवस लोकांना अन्न-पाण्याशिवाय भीषण परिस्थितीत दिवस कंठावे लागतायत. अशा स्थितीत पीडितांना मदत करायची सोडून मंत्री भलत्याच कामात अडकलेत. तर अधिकारी सुस्त आहेत.
पुराचे बळी कुणामुळं?
दादा पाटील बघताय नं काय घडलंय ते...? दादा, तुमचा इलाका आहे हा. इथले पालकमंत्री आहात तुम्ही. दादा, धरणातील विसर्ग सुरू झाल्याचं तुम्हाला कळलं नाही? कोयनेचं पाणी कृष्णेतून सांगलीत आणि पंचगंगेचं पाणी कोल्हापूरात कधी येतं विसरलात? पूर बघून कराडहून माघारी फिरलात?
गिरीश महाजन, राज्याचे जलसंपदा मंत्री आहात तुम्ही. धरणातून पाणी सोडायच्या आधी महाराष्ट्राच्या मंत्र्याचा कर्नाटकशी संवाद नको? कोयनेचं पाणी कुठून कुठं जातं त्याचा अभ्यास कोणी ठेवायचा?
सुभाषबापू, गेला महिनाभर राज्यात ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण होतेय. तुम्ही काय करताय? बापू, तुम्ही सोलापूरच्या पलीकडे बघणार की नाही?
सीएम साहेब, हे सगळं घडत असताना तुम्ही महाजनादेश यात्रा लगेच का नाही थांबवलीत ? यात्रेत राहून महाराष्ट्रावर कंट्रोल ठेवता येईल, ही तुमची अटकळ चुकलीच.
नेतेच असे वागले तर कामचुकार प्रशासन जबाबदारीचं भान कशाला ठेवेल ?
पाऊस वाढत असताना राज्याचे मुख्य सचिव, पुण्याचे विभागीय आयुक्त, कोल्हापूर-सांगलीचे आयुक्त काय करत होते? वाहत्या पाण्याला वाट मोकळी करण्यासाठी त्यांनी काय केलं ? प्रत्यक्ष जागेवरची परिस्थिती ओळखून ,त्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पावलं टाकण्यात ते का कमी पडले? पाण्याच्या फटक्यापासून लोकांना वाचवता येतं की नाही? प्रशासकीय अधिका-यांना धोका ओळखून आपत्ती निवरणाची मदत मागता आली नाही? त्यांनी मागूनही वेळेवर मदत मिळाली नसेल तर त्याला जे जबाबदार असतील त्यांची नावं तरी जाहीर करा. कोणत्या अधिकार्यांनी काय केलं ते तरी कळू दे लोकांना.
महालक्ष्मी एक्स्प्रेस पुरात अडकली असतानाही प्रशासन १२ तास सुस्त असतं. मंत्री एकनाथ शिंदे पाण्यात उतरतात. प्रशासनाला हाकतात. तेव्हा, मदत मिळायला लागते. लोकांनी हे असं आणखी किती वेळा सहन करायचं? प्रत्येक आपत्तीच्या वेळी त्यांनी जीव मुठीत धरूनच जगायचं काय?