Bhushi Dam Lonavala : सेल्फी आणि रिल्ससाठी पर्यटक भुशी धरणाच्या वाहत्या जोरदार पाण्याच्या प्रवाहात मनसोक्त फिरताना दिसतात. काही दिवसांपूर्वीच भूशी डॅम परिसरात एक दुर्घटना घडली ज्यात पाच जणांना आपला जीव गमवावा लागला. असं असतानाही आपला जीव धोक्यात घालून केवळ रिल्स आणि एका फोटोसाठी पर्यटक भुशी धरणाच्या पाण्याच्या मोठ्या प्रवाहात उतरल्याचं चित्र दिसतंय. पोलीस आणि जीवरक्षक हे मज्जाव करत असताना देखील हे पर्यटक पाण्याच्या प्रवाहात जात आहेत.
गेल्या आठवडाभर ओढ देणा-या पावसानं पुन्हा पर्यटननगरी लोणावळ्यात हजेरी लावलीये. यामुळं विक एंडच्या मूडला आणखीच बहर चढला आहे. डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या या निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी भूशी डॅमवर तोबा गर्दी केली आहे.
राज्यभरात पावसाने जोर धरला आहे. पावसामुळं निसर्गाच्या सौंदर्यात भर पडली आहे. पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. मात्र, मागील काही दिवसांमध्ये पर्यटन स्थळांवर होणाऱ्या अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भूशी डॅमच्या बॅक वॉटरमध्ये वाहून गेल्यानं पुण्याच्या अन्सारी कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला. तर रायगड जिल्ह्यात आणखी एका तरुणाचा मृत्यू झाला. या वाढत्या घटनांमुळे प्रशासनाने पर्यंटनस्थळांवर निर्बंध घातलेत.. पुणे आणि रायगडमधील अनेक पर्यटनस्थळांवर प्रतिबंध घालण्यात आले. आता नाशिक पोलिसांनी देखील जिल्ह्यातील 35 पर्यटनस्थळं आणि धरणांसाठी प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेत.
त्र्यंबकेश्वर, ब्रम्हगिरी, भावली धरण, ट्रिंगलवाडी किल्ला, गंगापूर बॅक वॉटर, काश्यपी धरण, हरिहर किल्ला, सुरगणा तालुका, हतगड किल्ला, भिवतास धबधबा, चणकापूर धरण, नांदुरीगड परिसर, हरणबारी धरण, साल्हेर-मुल्हेर किल्ला, मांगीतुंगी किल्ला, नांदुर मध्यमेश्वर धरण, नांदुरमध्यमेश्वर अभयारण्य परिसर, येवला, मालेगाव, अंकाई-टंकाई किल्ला, साळणा किल्ला परिसर या पर्यंटनस्थळांवर निर्बंध लागू करण्यात आलेत.
पर्यटन स्थळाच्या 1 किलोमीटर परिसरात वाहनांना बंदी, पर्यटन स्थळावर 5 पेक्षा अधिक जणांनी गर्दी केल्यास गुन्हे होणार दाखल, पर्यटन स्थळावर धोकादायक ठिकाणी सेल्फी, चित्रीकरण करण्यास बंदी, धोकादायक ठिकाणी वाहनं थांबवण्यास मनाई, ध्वनी, वायू, जल प्रदुषण होणा-या सर्व कृतींवर बंदी घालण्यात आली आहे. तर, प्रशासनाने घातलेल्या निर्बंधांविषयी पर्यटकांनी नाराजी व्यक्त केलीय. लोणावळ्यामध्येही जिल्हा प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश जारी केलेत.. मात्र भूशी धरण आणि आजुबाजुच्या परिसरात या आदेशाचं सर्रास उल्लंघन होताना दिसतंय. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जाते. मात्र त्याचा कोणताही विचार पर्यटक करत नाहीत.. एक नागरिक म्हणून पर्यटनस्थळांवर आपण स्वयंशिस्त पाळणंही गरजेचं आहे.