Ambarnath Honey Village : अंबरनाथ तालुक्यातील पिंपळोलीवाडी हे ठाणे जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव म्हणून घोषीत केले जाणार आहे. त्यासाठीची प्रक्रिया खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने सुरू करण्यात आली असून गावात तसे फलकही गावात लावण्यास सुरूवात झाली आहेत. यापूर्वी ठाणे जिल्ह्यातील बदलापूरच्या जांभळांना भौगोलिक मानांकन मिळालं आहे.
अंबरनाथ तालुक्यातील पिंपळोलीवाडी हे ठाणे जिल्ह्यातील पहिले मधाचे गाव म्हणून घोषीत करण्यात आलेय. अंबरनाथ तालुक्यासाठी ही गौरवाची बाब आहे. आदिवासींना रोजगार आणि पर्यटनाच्या दृष्टीने बदलापूर आणि परिसराचा विकास होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून बदलापूरच्या जांभळाला गतवैभव मिळवून देण्यासाठी बदलापूर जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्ट आणि स्थानिक आमदार किसन कथोरे करीत असलेल्या प्रयत्नांना यश आले आहे.
खादी ग्रामोद्योग महामंडळाच्या वतीने गावात तसा फलक लावण्यात आला. महामंडळाच्या वतीने मधमाशापालन आणि मधोत्पादनासाठी स्थानिकांना प्रशिक्षण, प्रोत्साहन तसेच येथे तयार होणाऱ्या मधाच्या विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. अंबरनाथ तालुक्यात बारवी धरणालगत असणाऱ्या या परिसरात अनेक जांभळांची झाडे आहेत. या गावात बहुतेक आदिवासी ठाकुर कुटुंबे राहतात.
याच परिसरात आढळणारे वैशिष्ट्यपूर्ण बदलापूर जांभूळ नुकतेच भौगोलिक मानांकनाच्या यादीत आले आहे. त्यामुळे या परिसरात प्रामुख्याने जांभूळ मधाचे उत्पादन घेतले जाणार असले तरी अन्य स्वादाच्या मध निर्मितीलाही प्रोत्साहन दिले जाणार असल्याची माहिती बदलापूर जांभूळ परिसंवर्धन आणि समुदाय विकास ट्रस्टचे आदित्य गोळे यांनी दिली.महाबळेश्वर तालुक्यातील मांघर हे देशातील पहिले मधाचे गाव म्हणून घोषीत झाले. त्यानंतर कोल्हापूरजवळील पाटगांव मधाचे गाव ठरले. त्यानंतर आता अंबरनाथ तालुक्यातील पिंपळोली आणि पालघर तालुक्यातील घोलवड या गावांना मधाचे गाव दर्जा देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.