कैलास पुरी, झी मिडिया पिंपरी चिंचवड : शहरात स्वतंत्र पोलिस आयुक्तालय होणार म्हणून पिंपरी चिंचवड मधले राजकारणी खूष आहेत. पोलिस ही पाठ थोपटून घेत आहेत पण गेल्या काही दिवसातल्या गुन्हेगारीच्या घटना आणि आज चिंचवड पोलrस स्थानकापासून हाकेच्या अंतरावर झालेल्या हत्येन हे शहर हादरून गेलंय आहे. या शहराला असुरक्षित वाटू लागलं आहे. पिंपरी चिंचवड या शहराला नेमकं काय वाटतं जाणून घेऊया.
मी पिंपरी चिंचवड. या पूर्वी ही मी दोनदा मी तुमच्याशी संवाद साधला आहे. दुर्दैव हेच की तिसऱ्यांदा संवाद साधताना विषय एकच... वाढती गुन्हेगारी... संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली, जगतगुरु तुकाराम महाराजांच्या वैभवशाली परंपरेचा आणि महान साधू मोरया गोसावी यांच्या वास्तव्याने शहर पुनीत झाल्याचा मला केवढा तो अभिमान... देशातलं सर्वाधिक विकसित शहर, बेस्ट सिटी आणि स्मार्ट सिटी ही बिरुदावली मिळाल्याचा ही मला किती अभिमान... पण हा अभिमान पुरता गाडून टाकण्याचा विडाच जणू राजकारणी आणि पोलिसांनी उचललाय... दर दहा दिवसाला भर रस्त्यात खून काय पडतायेत... बलात्कार, विनयभंग हे तर नित्याचेच झालंय... गाड्या तोडफोडीने, घरफोड्यानी सर्वसामान्य हवालदिल झालाय... मटक्याचे अड्डे, दारूचे अड्डे तर बोलायला नको...पण ते राजकारणी आणि पोलिसांना दिसतील कसे म्हणा...!
आता म्हणे स्वतंत्र पोलिस आयुक्तालय होतंय... म्हणून हे राजकारणी आपली पाठ थोपटून घेताहेत... आता श्रेयवाद होईल, बॅनरबाजी होईल.. पण स्वतंत्र आयुक्तालय झालं म्हणून तुम्हा राजकारण्यांच्या जीवावर सर्वसामान्यांना वेठीला धरणाऱ्या या गावगुंडांना वचक बसेल ? एखाद्या हिरो सारखे शहरातले गावगुंड सोशल मीडियावर स्वत:चं उदात्तीकरण करत असताना ते पोलिसांना मात्र सापडत नाहीत त्याचं काय करायचं.... कोवळी कोवळी पोरं या गुन्हेगारीकडे आपसून वळताहेत, याला आळा घालणं राजकारण्यांना पोलिसांना जमणार आहे, महिलांना सुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करणं जमणार आहे, कुणाच्याही गाड्या फुटणार नाहीत, घरफोडी होणार नाही हे इतका कायद्याचा वचक या पोलीस आय़ुक्तालयानं निर्माण होणार आहे? पुन्हा कळकळीनं एकच सांगणं... पोलीस, राजकारणी, आणि पिंपरी-चिंचवडकर सगळ्यांनाच.... हे शहर विनाशाच्या दरीत जाण्यापासून रोखा, या शहराची गुन्हेगारांचं शहर होण्यापासून तुम्हीच रोखू शकता... गरज आहे दुर्दम्य इच्छाशक्तीची... कायद्याचा मान बाळगण्याची... निर्भय बनण्याची... डोळे उघडण्याची.