महाराष्ट्रातील तरुण सरपंचांच्या संवादाने पंतप्रधान मोदीही प्रभावित

पंतप्रधानांनी सरपंच प्रियंका मेदनकर यांना दिला हा सल्ला

Updated: Apr 24, 2020, 03:05 PM IST
महाराष्ट्रातील तरुण सरपंचांच्या संवादाने पंतप्रधान मोदीही प्रभावित title=

ब्युरो रिपोर्ट :  ‘’तुमच्यासारखी सुशिक्षित सरपंच बरंच काही करू शकेल, बचतगटांद्वारे वेगवेगळी उत्पादने तयार करा आणि सरकारच्या अँपवर अपलोड करा, त्याला देशभरातून प्रतिसाद मिळेल....,’’ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुणे जिल्ह्यातील मेदनकरवाडी गावच्या तरुण सरपंच प्रियंका मेदनकर यांना हा सल्ला दिला. पंतप्रधान मोदी यांनी आज पंचायत राज दिनानिमित्ताने देशभरातील निवडक सरपंचांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगने संवाद साधला. तेव्हा मेदनकरवाडीच्या महिला सरपंच प्रियंका मेदनकर यांनी लॉकडाऊन दरम्यान गावात केलेल्या प्रभावी उपाययोजनांची माहिती पंतप्रधानांना दिली. पंतप्रधानांनी विचारलेल्या प्रश्नांना प्रियंका यांनी मोठ्या आत्मविश्वासानं आणि मुद्देसूद उत्तरे दिली आणि त्यांच्या उत्तरानं पंतप्रधानही प्रभावित झाले.

कर्नाटक, बिहार, पंजाबमधील सरपंचांशी संवाद साधल्यानंतर पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील पुण्याजवळच्या मेदनकरवाडीच्या सरपंच प्रियंका मेदनकर यांच्याशी संवाद साधण्यास सुरुवात केली. लॉकडाऊनमध्ये गावातील उपाययोजनांबाबत पंतप्रधानांनी प्रियंका यांना प्रश्न विचारला, तेव्हा गावात केलेल्या प्रभावी उपाययोजनांची अत्यंत मुद्देसूद माहिती त्यांनी पंतप्रधानांना दिली. गावात लॉकडाऊनच्या आदेशाचं पालन कशा पद्धतीनं केलं जात आहे, रेशन दुकानं, भाजी बाजारात गर्दी होऊ नये म्हणून कसं नियोजन केलं, गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये शेतकऱ्यांचा माल थेट पोहचवण्यासाठी केलेलं नियोजन, गावात सॅनिटायरचं वाटप, क्वारंटाईन सुविधा, लॉकडाऊनचा कालावधी वाढवल्यानंतर गावात पुन्हा एकदा निर्जंतुकीकरण अशा अनेक उपाययोजनांची माहिती प्रियंका यांनी दिली.

तुमच्या गावातील लोक आता थकले असतील, ते म्हणत असतील मोदींनी हे काय केले आहे? असं पंतप्रधान मोदी यांनी प्रियंकांना विचारलं. तेव्हा आपल्या देशाचे पंतप्रधान हे आमच्या आरोग्यासाठीच करत आहेत, अशी लोकांची भावना असल्याचं उत्तर प्रियंका यांनी दिलं. त्यानंतर पंतप्रधानांनी गावची लोकसंख्या किती आहे असा प्रश्न प्रियंका यांना केला. २०११ च्या जनगणनेनुसार गावात १२ हजार ५७६ इतकी लोकसंख्या असल्याची माहिती पंतप्रधानांना दिली. तसंच जवळच चाकण एमआयडीसी असल्याने परप्रांतातील ५० हजार लोक गावात राहतात अशी माहितीही दिली. गावातील बचत गटाच्या महिलांनी ५००० मास्क बनवल्याची माहिती प्रियंका यांनी दिली तेव्हा त्यांचं अश्वासक उत्तर पंतप्रधानांनाही भावल्याचं दिसलं. बचतगटामार्फत अन्य वस्तू गावात बनवू शकता, केंद्र सरकारच्या अँपवर त्या अपलोड करा, असा सल्ला पंतप्रधानांनी दिला. तुम्ही सुशिक्षित आहात, तुम्ही बरंच काही करू शकता, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.

जाता जाता प्रियंका यांनी काव्यात्मक दोन ओळी ऐकवण्याची परवानगी पंतप्रधानांकडे मागितली. त्या म्हणाल्या...

कोशिश जारी है, हिंमत बरकरार है....

एक ना एक दिन ये हालात बदलेंगे जरूर.....

पंतप्रधान मोदी यांनीही प्रियंका यांच्या या विश्वासाला दाद दिली. पंतप्रधान म्हणाले, तुमचे शब्द हाच जनतेचा विश्वास आहे. हे शब्दच संकटातून बाहेर पडायला बळ देतील....

 

कोण आहेत प्रियंका मेदनकर?

प्रियंका मेदनकर वयाच्या २३ व्या वर्षी मेदनकरवाडीच्या सरपंच झाल्या. मेदनकरवाडीच्या मतदारांनी प्रियंका यांना सरपंचपदी निवडून दिल्यानंतर तरुण  आणि उच्चशिक्षित सरपंच म्हणून त्या चर्चेत आल्या होत्या. त्या भाजपच्या कार्यकर्त्या आहेत. सरपंच झाल्यानंतर त्यांनी राबवलेल्या विविध उपक्रमांमुळेही त्यांचे कौतुक झाले आहे.