Video: पोलंडमध्ये मोदींचं चक्क मराठीत भाषण! म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या..'

Video PM Modi Talks In Marathi On Poland Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चक्क मराठीमध्ये पोलंडमधील आपल्या भाषणाची सुरुवात करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

स्वप्निल घंगाळे | Updated: Aug 22, 2024, 06:31 AM IST
Video: पोलंडमध्ये मोदींचं चक्क मराठीत भाषण! म्हणाले, 'छत्रपती शिवाजी महाराजांच्या..' title=
मोदींच्या भाषणाचा व्हिडीओ व्हायरल

Video PM Modi Talks In Marathi On Poland Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पोलंडच्या दौऱ्यावर असून बुधवारी केलेल्या एका भाषणाची सुरुवात त्यांनी थेट मराठीमधून केली. पोलंडमध्ये जाऊन पंतप्रधान मोदी मराठीत भाषण देत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या एक्स अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर केला आहे. यावेळेस मोदींनी आपल्या भाषणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचाही आवर्जून उल्लेख केल्याचं पाहायला मिळालं.

पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

फडणवीस यांनी मोदींनी मराठीमध्ये भाषणाला सुरुवात केल्याचा व्हिडीओ शेअर करताना, "दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलिश निर्वासित नागरिकांना महाराष्ट्राने दिलेला आश्रय आणि त्यातून महाराष्ट्राचा व भारताचा झळकलेला उदारमतवादी विचार, या साऱ्याचे स्मरण करुन दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे आभार! मैत्री आणि शौर्याचा वारसा! पोलंड आणि भारताच्या राजनैतिक संबंधांची ऐतिहासिक 70 वर्षे!," अशी कॅप्शन दिली आहे.

मोदी मराठीत भाषण देताना काय म्हणाले?

"महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीच्याप्रती पोलंडच्या नागरिकांनी व्यक्त केलेला हा सन्मान आहे. मराठी संस्कृतीमध्ये मानव धर्माच्या आचरणाला सर्वाधिक प्राधान्य आहे," असं पंतप्रधान मोदी मराठीत म्हणाले. तसेच पुढे बोलताना, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने कोल्हापूरच्या राजघराण्याने पोलंडच्या महिला आणि मुलांना आश्रय दिला होता. तिथे सुद्धा एक फार मोठा कॅम्प तयार करण्यात आलेला. पोलंडच्या महिलांना आणि मुलांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून महाराष्ट्राच्या लोकांना दिवस-रात्र एक करत काम केलं होतं," असंही मोदींनी भाषणामध्ये भारत आणि पोलंडच्या संबंधांसंदर्भात भाष्य करताना म्हटलं.

स्मृतीस्थळालाही दिली भेट

मोदींनी पोलंडमधील वॉर्सा येथील कोल्हापूर मेमोरिअललाही भेट दिली. या भेटीचे दोन फोटो त्यांनी सोशल मीडियावरुन शेअर केले आहेत. "वॉर्सा येथील कोल्हापूर स्मृतीस्थळावर आदरांजली वाहिली. हे स्मारक म्हणजे कोल्हापूरच्या महान राजघराण्याला पोलंडवासियांनी अर्पण केलेली श्रद्धांजली आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात विस्थापित झालेल्या पोलिश महिला आणि मुलांना आश्रय देण्यात हे राजघराणे आघाडीवर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन, कोल्हापूरच्या महान राजघराण्याने मानवतेला सर्वोच्च स्थान देत पोलिश महिला आणि मुलांना सन्मानाचे जीवन जगता येईल हे सुनिश्चित केले. करुणेची ही कृती पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील," असं पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत म्हटलं आहे.

पोलंडचं कोल्हापूरशी काय कनेक्शन?

दुसऱ्या महायुद्धादरम्यान रशियन लष्करानं पोलंडवर हल्ला करून पोलिश नागरिकांना त्यांच्याच देशातून हुसकावून लावलं होतं. त्यावेळेस लाखो पोलिश नागरिक जीवाच्या भीतीनं वाट फुटेल तिकडे धावत सुटले. त्यात महिला आणि मुलांचे फार हाल झाले. युद्धकाळात देशातील निर्वासितांची सोय करण्याची विनंती तेव्हा पोलंड सरकारनं जगभरातील देशांकडे केली होती. या अडचणीच्या काळात भारतातील शहाजी महाराज छत्रपती आणि जामनगरच्या बालाचडी यांनी पोलंडवासियांना मदतीचा हात पुढे केला होता. 

संपूर्ण गावच स्थापन केलं

जामनगर संस्थाननं 1 हजार पोलिश नागरिकांना आश्रय दिला होता. तर कोल्हापूरच्या शहाजी महाराज छत्रपती यांनी पोलंडमधील जवळपास 6 हजार निर्वासितांना आश्रय दिला होता. कोल्हापूरपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या वालिवडे गावात निर्वासितांची सोय करण्यात आली. 1943 ते 1948 पर्यंत सुमारे 5 हजार पोलिश नागरिक वालिवडेमध्ये राहिले. या छावणीत घरं, शाळा, दुकानं, प्रार्थनेसाठी चर्च आणि मुलांसाठी अतिरिक्त उपक्रमांसाठी जागा अशी व्यवस्था करण्यात आली होती. गरजेच्या वस्तू मिळवण्यासाठी आठवडी बाजारही भरवले जात होते.