कोल्हापूरचं 'पोलंड कनेक्शन', मोदींच्या दौऱ्यामुळे इतिहासाला उजाळा

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात बेघर झालेल्या पोलंडच्या हजारो नागरिकांना कोल्हापूरनं आश्रय दिला. त्याची आठवण म्हणून पोलंडमध्ये उभारण्यात आलेल्या खास स्मृतीस्तंभाचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार आहे.. यासाठी मोदी पोलंडमध्ये दाखल झाले आहेत.  

राजीव कासले | Updated: Aug 21, 2024, 09:48 PM IST
कोल्हापूरचं 'पोलंड कनेक्शन', मोदींच्या दौऱ्यामुळे इतिहासाला उजाळा title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर :  दुसऱ्या महायुद्धापासून भारत आणि पोलंडच्या मैत्रीचा धागा जुळलाय. महायुद्धाच्या काळात रशियन लष्करानं पोलंडवर हल्ला करून पोलिश नागरिकांना त्यांच्याच देशातून हुसकावून लावलं. लाखो पोलिश नागरिक जीवाच्या भीतीनं वाट फुटेल तिकडे धावत सुटले. त्यात महिला आणि मुलांचे मोठे हाल झाले. युद्धकाळात देशातील निर्वासितांची सोय करा,अशी विनंती तेव्हा पोलंड सरकारनं जगभरातील देशांना केली. या अडचणीच्या काळात भारतातील जामनगरच्या बालाचडी आणि शहाजी महाराज छत्रपती यांनी पोलंड वासियांना मदतीचा हात पुढे केला.

कोल्हापूरचं पोलंड कनेक्शन
जामनगर संस्थाननं 1 हजार पोलिश नागरिकांना आश्रय दिला होता. तर कोल्हापूरच्या शहाजी महाराज छत्रपती यांनी पोलंडमधील जवळपास 6 हजार निर्वासितांना आश्रय दिला होता. कोल्हापूरपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या वालिवडे गावात निर्वासितांची सोय करण्यात आली. 1943 ते 1948 पर्यंत सुमारे 5 हजार पोलिश नागरिक वालिवडेमध्ये राहिले. या छावणीत घरं, शाळा, दुकानं, प्रार्थनेसाठी चर्च आणि मुलांसाठी अतिरिक्त उपक्रमांसाठी जागा अशी व्यवस्था करण्यात आली होती. गरजेच्या वस्तू मिळवण्यासाठी आठवडी बाजारही भरवले जात होते. भारताच्या या मदतीचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख असलेल्या स्मृतीस्तंभाचं अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते पोलंडमध्ये होणार आहे. 

पोलंडवासीयांच्या मनात आजही वळीवडे कॅम्प आणि भारताबद्दल आदराचं स्थान आहे. आजही पोलंडमधून हजारो पर्यटक वळीवडेला येतात. 2019 आणि 2021 मध्ये वळिवडेला पुराचा फटका बसल्यानंतर पोलंडमधील नागरिकांनी मदत केली. एवढंच नव्हे तर युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी पोलंड देश पुढे सरसावला होता. आता पंतप्रधान मोदींच्या ऐतिहासिक पोलंड दौऱ्यामुळे दोन्ही देशातील संबंध बळकट होणारायत..  तसेच दोन्ही देशांमधील आर्थिक आणि इतर क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढीस लागणाराय.