PM Narendra Modi : महाराष्ट्रातून (Maharashtra) निघून गेलेल्या पाच प्रकल्पांमुळे राज्यात वातावरण तापलं आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर यावरुन जोरदार टीका करण्यात येत आहे. सत्तातरानंतर महत्त्वाचे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर (Maharashtra) गेल्याची टीका विरोधकांनी केली आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनीही यावरुन महाराष्ट्रात मोठे प्रकल्प येणार असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रात 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी दिली आहे. मुंबईत (Mumbai) रोजगार मेळाव्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी याबाबत माहिती दिली. रोजगार मेळाव्यानिमित्त नियुक्तीपत्रांचे वाटप करताना महाराष्ट्रात भविष्यात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील असेही पंतप्रधान मोदी म्हणाले. (pm narendra modi Big announcement from maharashtra 225 projects worth 2 lakh crore approved)
"देशभरात पायाभूत सुविधा, माहिती-तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये सरकार मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे. यामुळे रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होत आहेत. महाराष्ट्रात 2 लाख कोटींपेक्षा जास्त 225 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पांवर काम सुरु आहे किंवा सुरु होत आहे. महाराष्ट्रात रेल्वेसाठी 75 हजार कोटी आणि रस्ते विकास प्रकल्पासाठी 50 हजार कोटींचा निधी देण्यात आला आहे," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
"केंद्र सरकार पायाभूत सुविधांवर खर्च करत असताना त्यातून रोजगाराच्या लाखो संधी निर्माण होतात. भविष्यात महाराष्ट्रात तरुणांसाठी रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होतील," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.