हिंगोलीतील अपहरण करण्यात आलेल्या तरुणाची पोलिसांनी केली सुटका

तीन दिवसापूर्वी हिंगोली जिल्ह्यातून अपहरण करण्यात आलेल्या १८ वर्षीय तरुणाची सिनेस्टाईल घटनेप्रमाणे उस्मानाबाद पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली आहे.

Updated: Aug 22, 2017, 05:39 PM IST
हिंगोलीतील अपहरण करण्यात आलेल्या तरुणाची पोलिसांनी केली सुटका title=

उस्मानाबाद : तीन दिवसापूर्वी हिंगोली जिल्ह्यातून अपहरण करण्यात आलेल्या १८ वर्षीय तरुणाची सिनेस्टाईल घटनेप्रमाणे उस्मानाबाद पोलिसांनी अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली आहे.

यामध्ये उस्मानाबाद जिल्हयातील वाशी येथील एका हॉटेल मालकाशी झालेल्या वादामुळे अपहरण झालेल्या तरुणाची सुटका करण्यात यश आले आहे. हिंगोलीतल्या गणेश श्रीकृष्ण शिंदे हा तरुण तीन दिवसांपूर्वी आपल्या वडिलांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी एटीएमवर गेला होता. खात्यातून त्यानं ३ हजारांची रक्कम घेऊन बाहेर पडणाऱ्या गणेशचं चार अज्ञातांनी अपहरण केले. हत्यारांचा धाक दाखवून त्याला गाडीच्या डिक्कीत कोंबले आणि तीन दिवस वेगवेगळ्या गावात फिरवले.

हिंगोली शहरापासून अपहरणकर्त्यांनी लातूर, नांदेड, आंध्रप्रदेश तसंच कळंब मार्गे पारगाव असा तीन दिवस प्रवास केला. गणेशला मारहाण करुन त्या तरुणाच्या 
चेहऱ्याला रक्ताचे डाग लावून त्याचा फोटो गणेशच्याच मोबाईलवरून त्याच्या पालकांना पाठवून दोन लाखांची मागणी केली. पैसे न दिल्यास मुलास जीवे मारु, अशी धमकीही दिली.

या धमकीमुळे गणेशचे नातेवाईक घाबरले होते.  यासंदर्भात त्यांनी स्थानिक हिंगोली पोलिसांना माहिती दिली. शिंदे कुटुंबाने अपहरणकर्त्यांना भूलवण्यासाठी वेळोवेळी गणेशकडे असलेल्या एटीएम खात्यावर पैसे टाकले. हे पैसे काढून घेण्यात आल्यानंतर मिळालेल्या लोकेशननुसार अपहरणकर्त्यांच्या मागावर हिंगोली पोलीस लक्ष ठेवून होते.

२१ ऑगस्टला दुपारीच्या बाराच्या सुमारास अपहरणकर्त्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पारगाव जवळच्या विसावा ढाब्यावर जेवण केलं. त्यावेळी त्यांच्याकडच्या गाडीने बोअरवेलचा पाईप तुटल्याने शेतकऱ्यांबरोबर वाद झाला. हा वाद वाढतच गेला. अपहरणकर्त्यांनी ढाबा चालकावर कोयताही उगारला. त्यावेळी नागरिकांनी अपहरणकर्त्यांना चोप देण्याचा प्रयत्न केला असता ते पळून गेले. मात्र गाडीची चावी ढाब्याच्या मालकांकडे असल्याने त्यांनी गाडीची डिक्की उघडली. त्यात त्यांना हात, पाय आणि तोंड बांधून ठेवलेल्या अवस्थेत  गणेश आढळला. घटनेचे गांभीर्य ओळखून वाशी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस आणि गावकऱ्यांनी यांनी पळून गेलेल्या अपहरणकर्त्यांचा पाठलाग केला आणि त्यांना बाजूच्या शेतातून ताब्यात घेतलं.

उस्मानाबाद पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेऊन हिंगोली पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. या सगळ्यात अपहरण झालेल्या गणेशची सुटका झाल्याने शिंदे कुटुंबानं सुटकेचा निश्वास सोडलाय.