नाशिक : लासलगावच्या सतीश काळे यांच्या घरावर पोलिसांनी छापा घातला. सतीश काळे हे ढोकेश्वर मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीचे चेअरमन आहेत. या पतसंस्थेच्या माध्यमातून काळेने हजारो तरुणांना नोकरीचं आमीष दाखवून लूबाडल्याचा आरोप आहे.
लासलगाव पोलिसांत या संदर्भात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सतीश काळेच्या घरावर छापा टाकला. मात्र पोलिस येण्यापूर्वीच सतीश काळेनं घरातून पळ काढला.
ढोकेश्वर मल्टिस्टेट को-ऑपरेटीव्ह पतसंस्थेच्या राज्यभरात १७५ शाखा आहेत. सतीश काळे रयत शिक्षण संस्थेत विंचूर येथे शिक्षक आहे. सुरुवातीला त्यानं हरी ओम गृपची स्थापना केली आणि प्लॉट खरेदी विक्रीचे व्यवहार सुरु केले. यातही त्यानं मोठा अपहार केल्याचा आरोप आहे. त्यानंतर काळेनं पतसंस्थेची स्थापना करुन हजारो तरुणांना लूबाडलंय. सध्या सतीश काळे फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.