Political News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची भाजपची तयारी

Political News : लोकसभा आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्याची तयारी महाराष्ट्र प्रदेश भाजपाने सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे प्रदेश भाजपनं पाठवल्याचंही पुढे आल आहे.  

Updated: Mar 21, 2023, 12:13 PM IST
Political News : लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची भाजपची तयारी title=

Political News : लोकसभा (Lok Sabha) आणि महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका (Maharashtra Assembly Election) एकत्र घेण्याची तयारी महाराष्ट्र प्रदेश भाजपाने (BJP) सुरु केल्याची माहिती समोर येत आहे. अशा प्रकारचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे प्रदेश भाजपनं पाठवल्याचंही पुढे आल आहे. याविषयावर कॅमेऱ्यावर बोलण्यास तूर्तास भाजपचे कोणतेही नेते तयार नाहीत. 2024 च्या एप्रिल आणि मे महिन्यात देशात सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. या निवडणुकीनंतर अवघ्या चार ते पाच महिन्यातच विद्यमान महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळही संपत आहे. म्हणूनच लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणूका सोबत घेणे शक्य होणार आहे.

 प्रस्ताव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे ?

मोदींच्या लोकप्रियतेचा फायदा घेऊन राज्य विधानसभेतही जास्तीत जास्त जागा मिळवता येऊ शकतात, असा प्रदेश भाजपमधील धुरीणांचा होरा आहे. म्हणूनच दोन्ही निवडणूका एकत्र घेण्याचा प्रस्ताव भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवण्यात आल्याची माहिती आहे. भाजपकडूनही तशी तयारी सुरु आहे. देशात सध्या असलेले अनुकूल वातावरण आणि ‘वन नेशन-वन इलेक्शन’चा प्रयोग म्हणून लोकसभा निवडणुकीसोबतच महाराष्ट्र आणि इतर नऊ राज्यांच्या निवडणुका घेण्याबाबत हालचाली सुरु झाल्या आहेत. महाराष्ट्र भाजपकडून तसा प्रस्तावावर काम करत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, भाजपकडून याबाबत अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही.

पुढील वर्षी म्हणजे, मार्च 2024 मध्ये लोकसभेची मुदत संपते. या निवडणुकीची प्रक्रिया फेब्रुवारी 2024 पासून सुरु होईल, तर महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक सप्टेंबर 2024 मध्ये आहे. या निवडणुकीची प्रक्रिया जुलै किंवा ऑगस्टपासून सुरु होईल. त्यामुळे या निवडणुका एकत्र घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. तशी चाचपणी सुरु केल्याचे बोलले जात आहे. मोदींची प्रसिद्धी कॅच करुन देशात एकत्रित निवडणुका लढविण्याची तयारी भाजपकडून सुरु असल्याचे बोलले जात आहे. 

संजय राऊत यांची भाजपवर टीका

दरम्यान, लोकसभा आणि विधानसभा एकत्र घेण्याचा भाजपचा प्रस्ताव यावर संजय राऊत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. मोदींमुळे भाजपला फायदा होतो. देशाला फायदा होतो का ?, असा सवाल उपस्थित केला आहे. भाजपला सत्ता मिळावी यासाठी लोकसभा विधानसभा एकत्र घेण्याचं काम सुरू आहे. भाजपनं एकमेव धोरण आहे सत्ता. सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हेच भाजपचे काम आहे. देशात अनेक गोष्टी इतिहासांत घडल्या नाहीत ते काम भाजप करत आहे, अशी टीका राऊत यांनी यावेळी केली. ते म्हणाले, एका राज्याचं बजेट केंद्र सरकारने थांबवले आहे. बाळासाहेबांची शिवसेना एका फुटलेल्या गटाच्या हातात दिली आहे.