नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे : शिवसृष्टीवरून पुण्यात पुन्हा एकदा वाद पेटला आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला केंद्र सरकारने पाच कोटी रुपये दिले. हेच या वादाचं कारण ठरलंय. भाजप आणि ब्राम्हण महासंघानं पाच कोटी रुपये देण्याच्या निर्णयाचं स्वागत केलंय. संभाजी ब्रिगेड बाबासाहेब पुरंदरेंच्या शिवसृष्टीलाच विरोध केलाय. तर, महापालिकेची शिवसृष्टी होऊ द्यायची नाही. हा भाजपचा डाव असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केलाय.
आंबेगावमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांची शिवसृष्टी उभी राहतेय. राज्य सरकारने या शिवसृष्टीसाठी आधी जागा दिली. आणि नंतर , पर्यटन धोरणानुसार मेगा प्रकल्पात या शिवसृष्टीचा समावेश केला. त्यामुळं तीनशे कोटी रुपयांपर्यंत निधी मिळणार आहे. त्यात आता केंद्र सरकारच्या मदतीची भर पडलीय. केंद्र सरकार जेएनपीटीच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांची मदत बाबासाहेबांच्या शिवसृष्टीला करणार आहे. मदतीचा हा धनादेश शनिवारी सुपूर्त केला जाईल. पण, या निर्णयावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं टीका केलीय. महापालिकेच्या शिवसृष्टीला सरकार जागा द्यायला तयार नाही... आणि दुसरीकडे मात्र बाबासाहेबांच्या शिवसृष्टीला मदत केली जातेय. त्यामुळं पुणेकरांची शिवसृष्टी होऊ द्यायची नाही, असा भाजपचा डाव असल्याचा आरोप करण्यात येतोय.
संभाजी ब्रिगेड आणि इतर संघटनांनीही या निर्णयाला विरोध केलाय. काँग्रेस आणि राष्रवाडीच्या पुढे जात, बाबासाहेब पुरंदरे यांची शिवसृष्टीलाच त्यांनी विरोध केलाय. बाबासाहेब पुरंदरे यांनी शिवाजी महाराजांचा खोटा इतिहास मांडला असा आक्षेप संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी घेतलाय.
भाजप आणि ब्राम्हण महासंघाने या निर्णयाचं स्वागत केलंय. पुण्यात दोन नाही तर, आणखीनही शिवसृष्टी उभारल्या जाव्यात. अशी मागणी ब्राम्हण महासंघाने केलीय. तर, महापालिकेची शिवसृष्टी देखील उभी राहणार आहे. त्यासाठी बाबासाहेब पुरंदरे यांच्या शिवसृष्टीला विरोध करण्यात अर्थ नाही, असं महापौर मुक्ता टिळक यांनी म्हटलंय.
महापालिकेची शिवसृष्टी मागील अनेक वर्षांपासून फक्त चर्चेत अडकलीय. आता भाजपवर आरोप करणाऱ्या काँग्रेस - राष्ट्रवादीला देखील त्यांच्या सत्ताकाळात ती करता आली नाही. त्यामळे यापुढेही शिवसृष्टीवरून राजकारण तापणार असल्याची शक्यता आहे.