किरण ताजणे, पुणे : पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाचा सविस्तर अहवाल वानवडी पोलिसांना प्राप्त झाला आहे. प्राथमिक अहवालाप्रमाणेच सविस्तर अहवालातही जबर दुखापतीनेच मृत्यु झाल्याचे स्पष्ट झालं आहे. आत्महत्येच्या किमान मुळ कारणापर्यंत पोचू शकणारा सविस्तर शवविच्छेदन अहवालही वानवडी पोलिसांना प्राप्त झाला आहे. मणक्याला व डोक्याला जबर दुखापत झाल्यामुळेच मृत्यु झाल्याचे कारण नमूद करण्यात आले आहे.
पूजा चव्हाणच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल वानवडी पोलिसांना यापुर्वी मिळाला होता. त्यामध्ये तिच्या डोक्याला व मणक्याला जबर दुखापत झाल्याने तिचा मृत्यु झाल्याचा उल्लेख होता.
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरण राज्यात चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात शिवसेनेचे नेते संजय राठोड यांचं नाव पुढे आल्यानंतर विरोधकांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी वाढली होती. त्यानंतर संजय राठोड यांनी राजीनामा ही दिला. भाजपकडून आता या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे.
पूजा चव्हाणने ७ फेब्रुवारीला आत्महत्या केली होती. ती राहत असलेल्या इमारतीवरुन उडी मारून तिने आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. पूजा चव्हाण ही मूळची बीड जिल्ह्यातली होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. दरम्यान पोलिसांना तिच्या लॅपटॉपमधून अनेक फोटो आणि ऑडिओ क्लिप मिळाल्य़ा आहेत.