केडीएमसी प्रशासनापुढे लोकप्रतिनीधी हतबल, खड्डे बुजविण्याचे काम अर्धवट

दिवाळीच्या मुहूर्तावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली.महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिवाळीच्या आदल्या रात्री स्वतः संपूर्ण कल्याण शहरात फिरून अधिकाऱ्यांकडून खड्डे बुजवण्याचं काम सुरू करून घेतलं. परंतु हे काम आता अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

Updated: Oct 26, 2017, 11:38 AM IST
केडीएमसी प्रशासनापुढे लोकप्रतिनीधी हतबल, खड्डे बुजविण्याचे काम अर्धवट title=

विशाल वैद्य / कल्याण : दिवाळीच्या मुहूर्तावर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली.महापौर राजेंद्र देवळेकर यांनी दिवाळीच्या आदल्या रात्री स्वतः संपूर्ण कल्याण शहरात फिरून अधिकाऱ्यांकडून खड्डे बुजवण्याचं काम सुरू करून घेतलं. परंतु हे काम आता अर्धवट स्थितीत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, खड्डे प्रश्नाबाबत आयुक्त पी. वेलारासु यांना काहीच देणंघेणं पडलेले नसल्याचं दिसून येत आहे. कारण आता खड्डे भरण्याच्या कामाला सुरुवात होऊन आठवडा उलटला तरी अर्धे कल्याण अद्याप खड्ड्यातच आहे आणि डोंबिवलीत तर अद्याप खड्डे भरण्याचा कामास सुरुवात सुद्धा झालेली नाही.

महापौर राजेंद्र देवळेकर यांनी १५ दिवसांत संपूर्ण कल्याण डोंबिवली खड्डेमुक्त करण्याचं आश्वासन दिलेलं होते. खड्डे भरण्याच्या कामाची पाहणी करण्यासाठी महापौरांनी अचानक मध्यरात्री दौरा केला. मात्र कासव गतीने चाललेल्या कामांमुळे महापौर चांगलेच संतापले आहेत. 

वास्तविक आयुक्तांनी या कामाची पाहणी करणे आवश्यक असताना ते मात्र केबिनच्या बाहेर येतच नाहीत आणि कामाच्या ठिकाणी फिरकतच नाहीत. परिणामी कामास विलंब होत असून  नागरिकांचा रोष वाढत आहे त्यामुळे महापौर चांगलेच संतप्त झाले असून प्रशासन जर काम नीट करत नसेल तर आता आम्हाला चाबूक हातात घेऊन यांच्या मागे लागावं लागेल अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.

प्रशासनाने मात्र खड्डे भरण्यासाठी उशीर झाल्याचं मान्य केलं. मात्र त्याच खापर लांबलेल्या पावसावर फोडले आहे. कामात दिरंगाईचा आरोप प्रशासनानं फेटाळला असून नव्या पद्धतीचा वापर करून खड्डे अधिक चांगल्या रीतीने भरण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाने केलाय.

दरम्यान  आयुक्त पी वेलारासु यांच्या कारभाराबाबत सत्ताधारी पक्षांमध्येच प्रचंड नाराजी वाढत आहे.आयुक्त काम करण्यास उत्सुकच नसल्याचा आरोप नगरसेवक करत आहेत. डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदे आणि महापौर राजेंद्र देवळेकर हे रस्ते कामाची पाहणी करण्याकरिता आले.मात्र प्रशासनाने अतिशय संथ गतीने चालवलेल्या कामांमुळे खासदार संतापून निघून गेले.