खुशखबर! शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता रविवारी मिळणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी एका क्लिकने देशातील १२ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ हजार कोटी रुपये ट्रान्सफर करणार आहेत.

Updated: Feb 22, 2019, 12:34 PM IST
खुशखबर! शेतकरी सन्मान निधीचा पहिला हप्ता रविवारी मिळणार title=

मुंबई: मोदी सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा केलेल्या 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजनेचा पहिला हप्ता येत्या रविवारी शेतकऱ्यांना मिळणार आहे. गोरखपूर येथील शेतकरी मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी एका क्लिकने देशातील १२ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २५ हजार कोटी रुपये ट्रान्सफर करणार आहेत. 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजनेतंर्गत अल्पभूधारक शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. तीन टप्प्यात हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये जमा होतील. केंद्र सरकारने या योजनेसाठी ७५ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. १ डिसेंबर २०१८ अशा पूर्वलक्ष्यी प्रभावाने ही योजना सुरु करण्यात आली होती. त्यानुसार आता शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळेल. 

राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ, मिझोराम, तेलंगणा या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला शेतकऱ्यांच्या रोषाचा फटका बसला होता. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजनेची घोषणा केली होती. तसेच शेतीपूरक उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारकडून कर्जावरील व्याजदरात सवलतही जाहीर करण्यात आली होती. 

दरम्यान, 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी अथवा ग्रामसेवकाकडे नोंदणी करावी लागेल. पाच एकराच्या आत जमीन असलेल्या म्हणजेच तलाठ्याकडे असलेल्या यादीतील शेतकऱ्यांनी नाव, गाव, वय, व्यवसाय, खाते क्रमांक, क्षेत्र, बँक खाते क्रमांक, आधार क्रमांक यांसह घोषणापत्र भरून तलाठी अथवा ग्रामसेवकाकडे जमा करावे. या योजनेचा लाभ देशातील १२ कोटी शेतकऱ्यांना मिळेल, असा दावाही पंतप्रधान मोदी यांनी केला होता. 

याशिवाय, 'पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी' योजनेपासून वंचित राहणाऱ्या उर्वरित सात लाख शेतकऱ्यांनाही लवकरच सरकारकडून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार स्वतंत्रपणे योजना सुरु करणार असल्याचे वृत्त ‘मुंबई मिरर’ने दिले आहे. या योजनेसाठी अर्थसंकल्पात ४ हजार ५०० कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक अनुदानासह विविध सवलती दिल्या जातील, असा जाणकारांचा अंदाज आहे.