गल्लीबोळातील नेत्यांवर हल्ले होतच असतात- प्रकाश आंबेडकर

या घटनेच्या निषेधार्थ आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी ठाणे आणि मुलूंड परिसरात निदर्शनेही केली. 

Updated: Dec 9, 2018, 10:51 PM IST
गल्लीबोळातील नेत्यांवर हल्ले होतच असतात- प्रकाश आंबेडकर title=

लातूर: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यावर झालेल्या हल्ल्यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी उपरोधिक टिप्पणी केली. गल्ली बोळातील नेत्यांवर असे छोटेमोठे हल्ले होतच राहतात, असे प्रकाश आंबेडकर म्हणाले. ते रविवारी लातूर येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. 
 
 रामदास आठवले शनिवारी अंबरनाथमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले असताना त्यांच्यावर एका व्यक्तीने हल्ला केला. येथील विमको नाका परिसरात रिपाईकडून संविधान गौरव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रामदास आठवले या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी रामदास आठवले यांनी भाषणही केले. यानंतर ते स्टेजवरून उतरून गाडीकडे चालत जात असताना प्रवीण गोसावी या तरूणाने त्यांच्या कानशिलात लगावली होती. या घटनेनंतर रामदास आठवले यांच्या संविधान या निवासस्थानाबाहेरील पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली. 
 
 रामदास आठवले यांना मारहाण का झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, माझी लोकप्रियता वाढत असून त्यामुळेच काही लोक माझा दु:स्वास करत आहेत. त्यामुळेच या लोकांनी माझ्यावर हल्ला केला असावा, अशी प्रतिक्रिया आठवले यांनी दिली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी ठाणे आणि मुलूंड परिसरात निदर्शनेही केली.