Walmik Karad Property: शून्य मोजता मोजता थकून जाल... वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून अधिकारी थक्क! ED ने पाठवली नोटीस

Walmik Karad Property ED Notice: वाल्मिक कराड पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयामध्ये 31 डिसेंबर रोजी शरण आला आहे. मात्र या प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे होत असतानाच नवी माहिती समोर आली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 7, 2025, 12:30 PM IST
Walmik Karad Property: शून्य मोजता मोजता थकून जाल... वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून अधिकारी थक्क! ED ने पाठवली नोटीस title=
वाल्मिकीला दोन महिन्यांपूर्वीच आली आहे नोटीस (प्रातिनिधिक फोटो)

Walmik Karad Property, Beed Sarpanch Murder Case: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाशीसंबंधित खंडणी मागितल्याने मंत्री धनंजय मुंडेंचे समर्थक वाल्मिक कराड यांना सीआयडीने अटक केली आहे. 31 डिसेंबर रोजी वाल्मिक कराड पोलिसांना शरण आल्यानंतर त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली जात असतानाच आता वाल्मिक कराडसंदर्भात धक्कादायक माहिती समोर आली आहे. वाल्मिक कराडला यापूर्वीच सक्तवसुली संचलनालयाकडून म्हणजेच ईडीकडून नोटीस आली होती. वाल्मिक कराडने जमवलेल्या संपत्तीचा आकडा पाहून ईडीच्या अधिकारीही थक्क झाल्याची चर्चा आहे.

अनेक नेत्यांकडून जाहीर भाषणांमधून आरोप

बीडचे खासदार बजरंग सोनावणेंबरोबरच भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी कशाप्रकारे वाल्मिक कराडने बेकायदेशीर उद्योगांच्या माध्यमातून बीडमध्ये दहशत पसरवली असून त्या माध्यमातून पैसा गोळा केल्याचं अनेक ठिकाणी झालेल्या आक्रोश सभांमध्ये जाहीर भाषणांमधून सांगितलं आहे. याचदरम्यान सुरेश धस यांनी अगदी सविस्तरपणे संतोष देशमुख हत्याकांड कसं घडलं आणि खंडणी कशी मागितली आणि दिली जाते याबद्दलची माहिती जाहीर कार्यक्रमांमध्ये दिली.

वाल्मिकची संपत्ती किती?

'झी 24 तास'ला 'टू द पॉइण्ट' कार्यक्रमात दिलेल्या विशेष मुलाखतीमध्ये सुरेश धस यांनी हावरटपणाचे राजकारण धनंजय मुंडेंनी केलं. धनंजय मुंडेंनी वाळुतून पैसा, राखेतून पैसा कमावला असून घरकुलांसाठी त्यांनी 10-10 हजार रुपयांची वसुली केल्याचा गंभीर आरोप केला. याच मुलाखतीमध्ये धस यांनी वाल्मिक कराडने 1500 कोटींची संपत्ती जमवल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. याच संपत्तीसंदर्भातील चौकशीसाठी ईडीची दोन महिन्यांपूर्वीच वाल्मिकला नोटीस आल्याचंही धस यांनी म्हटलं आहे. म्हणजेच आकड्यात सांगायचं झालं तर वाल्मिक कराडची संपत्ती 1500,000,00,00,000 इतकी आहे.

नक्की पाहा हे फोटो >> महाराष्ट्राला हादरवणाऱ्या सरपंच हत्याकांडात वाल्मिक कराडचं नाव का घेतलं जातंय? तो आहे तरी कोण?

काहीतरी पुरावा असणारच

धस यांनी केलेल्या या दाव्यासंदर्भात खासदार बजरंग सोनावणेंनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे. "सुरेश धस हे पाचव्या टर्मचे आमदार आहेत अभ्यास करून बोलणारे ते आहेत त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल तेव्हाच ते बोलले आहेत. शासनाने आणि पोलीस यंत्रणेने तो तपासला पाहिजे. महाराष्ट्रातील जनता याच्याकडे कसं पाहते आणि सरकार याच्याकडे कशा नजरेने बघत हे पाहिलं पाहिजे," असं म्हणत बजरंग सोनवणे यांनी धस यांच्या समर्थनार्थ प्रतिक्रिया नोंदवली आहे. "सुरेश धस यांच्याकडे पुरावा असेल म्हणून ते बोलत आहेत. त्यांचं बोलणं पोलीस यंत्रणा आणि सरकारने गांभीर्याने घेतलं पाहिजे. या सर्वांची चौकशी झाली पाहिजे," असंही सोनावणे यांनी वाल्मिक कराडच्या बेकायदेशीर संपत्तीसंदर्भात बोलताना म्हटलं आहे.

नक्की वाचा >> ...तर लोक मला जोड्यानं मारतील! सुरेश धसांचं विधान; पंकजा पालकमंत्री का नको हे ही सांगितलं

सरकारने लक्ष दिलं पाहिजे

कराडकडे 1500 कोटींची संपत्ती असल्याच्या धस यांच्या विधानावर बोलताना, "ते काही चुकीचं बोलतात असं मला वाटत नाही. ते पहिल्या टर्मला आमदार झालेत असं नाही. ते सरकारमधले आमदार आहेत. त्यांच्या बोलण्याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. हे प्रकरण सीबीआयकडे, ईडीकडे द्या, असा आम्हीही म्हणत आहोत. असं झालं तरच याच्यात खरी चौकशी होईल," असं बजरंग सोनवणे म्हणालेत.