Brutal Attack on Team India: भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने भारताचा ऑस्ट्रेलियातील बॉर्डर-गावसकर चषक स्पर्धेत झालेल्या दारुण परभावानंतर प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळेस हरभजनने माजी प्रशिक्षक राहुल द्रविडचा आवर्जून उल्लेख केला आहे. 2024 मध्ये वेस्ट इंडिजमध्ये टी-20 वर्ल्डकप जिंकला त्यावेळेस भारतीय संघ सर्वोच्च स्थानावर होता. या स्पर्धेचा अंतिम सामना हा द्रविडचा प्रशिक्षक म्हणून भारतीय संघासोबतचा शेवटचा सामना ठरला. मात्र द्रविड सोडून गेल्यानंतर संघाची एवढी पडझड का झाली? असा सवाल आता हरभजनने विचारला आहे.
द्रविडनंतर गौतम गंभीरच्या हाती भारताचं प्रशिक्षकपद सोपवण्यात आलं. तेव्हापासूनच भारतीय संघाला फारशी प्रभावी कामगिरी करता आलेली नाही. गंभीर प्रशिक्षक झाल्यानंतर भारताने श्रीलंकेविरुद्धची टी-20 मालिका 3-0 ने गमावली. एकदिवसीय मालिका 0-2 ने गमावली. त्यानंतर बांगलादेशविरुद्धची मालिका भारताने 2-0 ने जिंकली. मात्र नंतर न्यूझीलंडविरुद्ध भारतातच खेळताना भारताला 0-3 ने पराभव स्वीकारावा लागला. आता ऑस्ट्रेलियात भारताच्या पदरी 1-3 असा निराशाजनक निकाल पडला आहे. याचसंदर्भात हरभजनने त्याच्या युट्यूब चॅनेलवर भाष्य केलं आहे.
"मागील सहा महिन्यात भारताने श्रीलंकेविरुद्धची मालिका गमावली. न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत व्हाइट वॉश झाला. आता ऑस्ट्रेलियात 1-3 ने आपण पराभूत झालो. द्रविड प्रशिक्षक होता तोपर्यंत तोपर्यंत सारं ठीक होतं. भारताने वर्ल्ड कप जिंकला. सगळं काही सुरळीत होतं. मात्र अचानक असं काय झालं?" असा सवाल हरभजनने विचारला आहे. हरभजनने यावेळी सल्ला देताना कोणता खेळाडू किती मोठा आहे यापेक्षा कामगिरीवर आधारित निवड करुन खेळाडूंना संधी द्यावी असंही सुचवलं आहे.
"प्रत्येक खेळाडूची आपली एक ओळख आहे. जर ओळखीवरच घ्यायचं असेल तर कपिल देव, अनिल कुंबळेला पण संघात घ्या किंवा भारताला सामने जिंकून देणारे मोठे मॅच विनर संघात घ्या. बीसीसीआय आणि निवडकर्त्यांनी थांबून विचार केला पाहिजे. भारताने आता खेळाडू निवडीची सुपरस्टार पद्धत बाजूला सारली पाहिजे," असं हरभजन म्हणाला आहे.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावण्याबरोबरच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळण्याची संधीही गमावली आहे. ही स्पर्धा सुरु झाल्यानंतर यंदाचं पहिलं असं पर्व असेल जेव्हा भारतीय संघ अंतिम सामना खेळणार नाही. यापूर्वीच्या दोन्ही पर्वांमध्ये भारताने फायनलपर्यंत मजल मारली होती.