Banda Tatya Karadkar | बंडातात्या कराडकर यांना अनावृत्त पत्र

राज्यात दिवसभर फक्त न फक्त याच प्रकरणाची चर्चा होती. दरम्यान  बंडातात्या यांना शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी अनावृत्त पत्र लिहिलं आहे.  

Updated: Feb 4, 2022, 09:46 PM IST
Banda Tatya Karadkar | बंडातात्या कराडकर यांना अनावृत्त पत्र   title=

पुणे : ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. सोबतच मुख्मंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतही विधान केलं. यानंतर त्यांच्यावर महाराष्ट्रातून सडकून टीका करण्यात आली. ठिकठिकाणी आंदोलनं करण्यात आली. यानंतर अखेर बंडातात्या नमले आणि माफी मागितली. (president of sharad sports and cultural foundation lakshmikant khabiya wrote letter to bandatatya karadkar)

राज्यात दिवसभर फक्त न फक्त याच प्रकरणाची चर्चा होती. दरम्यान  बंडातात्या यांना शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी अनावृत्त पत्र लिहिलं आहे. या पत्रातून त्यांनी बंडतात्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करुन देण्याचा प्रयत्न केला आहे.  

लक्ष्मीकांत खाबिया यांनी लिहिलेलं पत्र जसंच्या तसं

माननीय बंडातात्या
सप्रेम जय हरी ...!

भारतीय संस्कृतीचा मेरूदंड असणारा  वारकरी संप्रदायाचा अध्यात्मविचार हा उच्च जाणिवा असणारा संप्रदाय आहे.  "सर्वां भूती भगवत भाव" या विचाराने हा संप्रदाय आपली परंपरा चालवतो. अनादी काळापासून आजतागायत नेहमीच वारकरी संप्रदायाने आपल्या  परंपरेला आणि थोरामोठ्यांना  सोबतच स्त्रियांना नेहमीच आदराचे स्थान दिले आहे. 

बंडातात्या आपण जे या संप्रदायाचे पाईक म्हनवून घेता आहात. आपणास या सर्व वारकरी परंपरा आणि जाणिवांचा विसर पडला की काय? असा प्रश्न आम्हा सर्व स्त्री शक्तीचा आदर करणाऱ्या आणि 'मातृ देव भव' असा विचार मानणारे यांना पडला आहे.

आपण ज्या ज्ञानोबानी  लहानग्या मुक्ताईला प्रसंगी गुरुस्थानी मानले. तुकोबांनी 'पराविया नारी रुक्मिणी मातेसमान', हा  स्त्री  महात्म्याच्या विचार सांगितला.  त्या विचारांना छेद देत नारी शक्तीचा जो अपमान आपल्या वक्तव्यातून केला त्याबद्दल मोठे आश्चर्य वाटते...!

आपल्या सारख्या एका जाणकार  आणि सुजान कीर्तनकाराने माननीय खासदार सुप्रियाताई सुळे आणि पंकजाताई  यांच्याबद्दल जी वक्तव्य, अशोभनीय भाषा वापरून केली. त्याचा आम्ही कडकडुन निषेध व्यक्त करतो. ...!

स्त्री शक्तीबद्दल आपण अशी वक्तव्य करावीत.. अशी भाषा वापरावी आणि तेही काही विशिष्ट विचारधारेच्या लोकांच्या प्रभावाखाली येऊन. स्त्रीशक्तीच्या सन्मानाला आघात पोहोचवावा हे आपल्याकडून बंडातात्या कधीच अपेक्षित नव्हते. 

जी भगवी पताका सकल संत मांदियाळीने नेहमीच उंच ठेवण्याचा प्रयत्न केला त्या  वारकऱ्यांची अस्मिता असणाऱ्या विटकरी पटकेला  तुम्ही  हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्या संघटनेच्या प्रभावाखाली नेऊ नये ही आपणास कळकळीची विनंती आहे....!

संत तुकारामांनी स्त्रियांना रुक्मिणी मातेचा दर्जा दिला. त्या स्त्रियांना तुम्ही अशा पद्धतीची खालच्या पातळीवरची भाषा वापरून त्यांचा घोर अपमान केला याचे आम्हाला आश्चर्य व पुन्हा निषेध व्यक्त करतो. 

मध्ययुगीन कालखंडाच्या 13 व्या शतकामध्ये उच्च विचार असणाऱ्या संतांनी स्त्रियांना लेखनाचं बळ दिलं त्यामध्ये सर्वांना बोलवल संप्रदाय मध्ये सर्वांचा स्वीकार केला. सर्वांना मानाचं स्थान दिलं त्यामध्ये 'यारे यारे लहानथोर | याती भलत्या नारी नर', शक्तीला सुद्धा सन्मानाने बोलवीलेलं आहे.

त्या मानवतावादी संप्रदायामध्ये आपण फूट निर्माण करून, सुप्रिया ताई आणि पंकजाताई सारख्या स्त्रियांच्या वैयक्तिक जीवनावरची वक्तव्य करून एक वेगळी भूमिका मांडण्याचा प्रयत्न करत आहात. हा  फुटीचा प्रयत्न येणाऱ्या काळामध्ये हाणून पाडला जाईल.

'नारी की निंदा मत करो l नारी है रतन की खान l जीस नारी ने पैदा किये राम कृष्ण और हनुमान' या वचनाचा आपणास विसर पडला की काय असा अनाकलनीय प्रश्न आम्हा सर्वांना पडलेला आहे? वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात स्त्री आणि पुरुष ही दोन रथाची चाकं आहेत आणि त्यांना नेहमीच समान दर्जा दिला पाहिजे. नाहीतर समाज रसातळाला जाईल. याचे आपण भान ठेवावे. 

'जिच्या हाती पाळण्याची दोरी, ती जगाला उद्धारी', या मातृत्व विचारासह जिने आपणास जन्म दिला तिला तरी आपण विसरू नये असे वाटते. 

मातेच्या स्वराष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात "मातेच्या स्वभावे पुत्राची घडण, त्यास उज्वल ठेवी तिचे वर्तन, स्त्रीच्या तेजावरच पुरुषाचे मोठेपण ऐसे आहे', याची आपणास आपण सुज्ञ असल्याने जाणीव असेलच अशी आशा आहे.

संत तुकारामांनी, 'मऊ मेनाहूनी आम्ही विष्णूदास, परी कठीण ऐसे वज्रास भेदू',विचार आम्ही मानतो.आणि ज्यांना हा विचार पटत नसेल त्यांना आम्ही 'भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथा हाणू काठी', या विचारांची जाणीव करून देऊ शकतो.
 
तूर्तास एवढेच...

लक्ष्मीकांत खाबिया
अध्यक्ष
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे, महाराष्ट्र