कराडांना संधी, मुंडे भगिनींना इशारा? मुंडेंना डावलून त्यांच्याच समर्थकाला मंत्रिपद

पक्षात दबावतंत्र चालणार नाही, असा स्पष्ट इशाराच भाजप नेतृत्वानं दिल्याची जोरदार चर्चा 

Updated: Jul 8, 2021, 09:24 PM IST
कराडांना संधी, मुंडे भगिनींना इशारा? मुंडेंना डावलून त्यांच्याच समर्थकाला मंत्रिपद title=

विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा काल विस्तार करण्यात आला. या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातील नारायण राणे, भारती पवार, कपिल पाटील आणि भागवत कराड यांच्या नावांचा समावेश आहे. गेले अनेक दिवस बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान मिळेल अशा चर्चा सुरू होत्या. पण या यादीत त्यांचं नाव नव्हतं. 

भागवत कराड हे औरंगाबादचे दोनदा महापौर झाले. गोपीनाथ मुंडे यांचे ते खंदे समर्थक राहीले. त्यांच्याच आशीर्वादानं कराड राजकारणात आले. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर ते पंकजा मुंडेंची सावली बनले. ध्यानीमनी नसताना गेल्यावर्षी त्यांना राज्यसभेचं खासदारपद मिळालं आणि आता तर त्यांना केंद्रीय अर्थ राज्यमंत्रिपदाची लॉटरी लागली.
 
खरं तर गोपीनाथ मुंडेंची कन्या, उच्चशिक्षित खासदार, दोनवेळा विक्रमी मतांनी विजय, ओबीसी चेहरा अशा सगळ्या जमेच्या बाजू असलेल्या प्रीतम मुंडे यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडेल, असं वाटत होतं. दिल्लीहून बोलावणं येण्याची वाट पाहत मुंडे भगिनी मुंबईतच होत्या. मात्र फोन काही आला नाही.  दरम्यान, पंकजा मुंडे नाराज नसल्याचं भाजपकडून सांगण्यात येतंय.

मंत्रिमंडळ विस्तारावरुन मुंडे भगिनी नाराज आहेत, असं कोण म्हणतं, निर्णय पक्ष वरीष्ठ स्तरावरुन घेतो, मुंडे भगिनींना उगाच बदनाम करुन नका, त्या नाराज नाहीत, असं विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 

दुसरीकडे, विधानसभेतील पराभवानंतर पंकजा मुंडे विधान परिषदेची तयारी करत होत्या. पण  भाजपनं त्यांच्याऐवजी रमेश कराडांना विधानपरिषदेवर पाठवलं. ओबीसी नेता म्हणून मुंडे यांच्या प्रतिमेला शह देण्याची रणनीती यामागं असावी असं बोललं जातं. एकीकडं ओबीसींचा नवा नेता म्हणून कराडांना प्रोजेक्ट केलं जात आहे. तर दुसरीकडं पक्षात दबावतंत्र चालणार नाही, असा स्पष्ट इशाराच भाजप नेतृत्वानं दिल्याची चर्चा आहे.

स्वतःला जनतेच्या मनातली मुख्यमंत्री म्हणवणाऱ्या पंकजा मुंडे यांच्यासाठी हा मोठा राजकीय धक्का आहे. भाजपानं इशारा दिला असला तरी पंकजा मुंडेंच्या भूमिकेवर मराठवाड्याच्या राजकारणाची पुढची गणितं अवलंबून असणार आहेत.