मुंबई : राज्यातील असंख्य विद्यार्थी राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या उपनिरिक्षक पदाच्या स्पर्धा परीक्षा देत असतात. या परीक्षांच्या प्रक्रियेत पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, शारिरीक चाचणी, मुलाखत हे तीन टप्पे असतात. यातील शारिरीक चाचणीसंदर्भातील नियमांमध्ये लोकसेवा आयोगाने काही बदल केले आहेत.
उपनिरिक्षक पदाच्या निवड प्रक्रियेत मुख्य परीक्षेनंतर शारिरीक चाचणी महत्वाचा टप्पा असतो. शारिरीक चाचणीत मिळालेले गुण अंतिम गुणतालिकेतही ग्राह्य धरले जात असत. परंतु आयोगाने आज अधिसूचना काढत शारिरीक चाचणीत मिळाळेले गुण अंतिम गुणतालिकेत धरण्यात येणार नसल्याचा निर्णय घेतला आहे.
शारिरीक चाचणीचे गुण हे 60 टक्के म्हणजेच 60 गुण मुलाखतीस पात्र असण्यासाठी आवश्यक असणार आहेत. उमेदवारांना मुलाखतीस पात्र ठरण्यासाठी कमीत कमी 60 गुण असणे आवश्यक असणार आहे. आयोगाने सुधारित शारिरीक मानके अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत प्रसिद्ध केली आहेत.