नितेश महाजन, झी मीडिया, बुलढाणा : पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानने ४० जवानांना मारले, त्यामुळे तुम्ही त्यांचे चार हजार जण मारा अशी संतप्त प्रतिक्रिया शहीद नितीन राठोड यांचे वडील शिवाजी राठोड यांनी दिली आहे. शहीद नितीन राठोड यांच्या पार्थिवावर बुलढाणामधील लोणार तालुक्यातील चोरपांगरा या मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राठोड कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. चोरपांगरा गावावरही या शोककळा पसरली आहे. शहीद नितीन राठोड यांच्या मुलानंही वडिलांप्रमाणे देशासाठी शहीद होण्यास तयार असल्याचं म्हटले आहे.
शहीद नितीन राठोड हे ज्या शाळेत शिकले त्या शाळेतील शिक्षकांनीही यावेळी नितीन राठोड यांच्या आठवणींना उजाळा दिला. नितीन यांच्या जाण्याची हळहळ देशभरात व्यक्त केली जात आहे. दरम्यान जवानांवर हल्ला करणाऱ्यांना जवान शिक्षा देतील. सरकारतर्फे त्यांना खुली सूट देण्यात आल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.
दहशतवादी हल्ल्यानंतर जवानांची ओळख त्यांचे आयकार्ड, आधार कार्ड यावरून करण्यात आली. भीषण विस्फोटानंतर त्यांचे मृतदेह छिन्नविछ्छिन्न अवस्थेत होते. यामुळे ओळख पटवणे कठीण गेले. काहींच्या मनगटावर असलेल्या घड्याळावरून तसेच त्यांच्याकडे असलेल्या सामानावरून त्यांची ओळख पटवली गेली. त्यांच्या सहकार्यांनी या वस्तू ओळखल्या.
या कारवाई दरम्यान सुरक्षादलाकडून ७ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी सतत छापेमारी सुरू आहे. सिंबू नबल येथून ६ जण तर लारू भागातून एकाला अटक करण्यात आली आहे. राष्ट्रीय शोध पथकाकडून (एनआयए) ही कारवाई करण्यात येत आहे. एनआयएची टीम आणि जम्मू-काश्मीर पोलिस एकत्रितपणे कारवाई करणार आहे. राष्ट्रीय सुरक्षा गार्डच्या (एनएनजी) विशेषज्ञांची टीमही पुलवामात घटनास्थळी दाखल झाली असून शोधकार्य सुरू आहे.