खाकीसाठी बोगस सर्टिफिकेट्स, राज्यात पोलीस भरतीमध्ये मोठा घोटाळा उघड

पुणे हे घोटाळ्याचं माहेरघर झालंय का असाच प्रश्न पडावा असे एक एक घोटाळे बाहेर येतायत. कधी बोगस सर्टिफिकेट घोटाळा, कधी बोगस शाळांचं प्रकरण तर कधी बोगस शिक्षक भरती घोटाळा. आता यात आणखी एका घोटाळ्याची भर पडलीय.

Updated: Aug 19, 2023, 06:40 PM IST
खाकीसाठी बोगस सर्टिफिकेट्स, राज्यात पोलीस भरतीमध्ये मोठा घोटाळा उघड title=

पुणे : राज्यात पोलीस भरतीमध्ये मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. भूकंपग्रस्तांचं बोगस कागदपत्र (Bogus Documents) बनवून पोलिसाची नोकरी मिळवण्याचे प्रकार घडलेत. अशाच एका रॅकेटचा (Racket) पुण्यात भांडाफोड झालाय.. शिवाजीनगर मुख्यालयात कार्यरत असलेला पोलिस शिपाई गोविंद इंगळेचं प्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आलं.. याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बनावट भूकंपग्रस्त (Earthquake Victims) प्रमाणपत्राचं एक रॅकेट परभणीत नुकतंच उघडकीस आलं. त्याच्या चौकशीत पुण्यातील काही पोलिस कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली गेली. तेव्हा हा सर्व प्रकार समोर आलाय. अशाच प्रकारे आणखीही कोणी पोलिसाची नोकरी मिळवलीय का याची चौकशी करण्यात येतेय..

काय आहे मोडस ऑपरेंडी
लातूर, परभणी, नांदेड या भागात मोठ्या प्रमाणावर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तांचे प्रमाणपत्र देणाऱ्या टोळ्या सक्रीय आहेत. भूकंपग्रस्त किंवा प्रकल्पग्रस्ताचं एक बोगस प्रमाणपत्र एक लाख 40 हजार ते अडीच लाखापर्यंत मिळतं. प्रकल्पग्रस्त किंवा भूकंपग्रस्ताला पकडून कोर्टात खोटा दावा दाखल केला जातो. कोर्टाबाहेर तडजोड करुन प्रमाणपत्र मिळवलं जातं. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी हेच बोगस प्रमाणपत्र वापरलं जातं

ही बोगस प्रमाणपत्रं पोलीस भरतीसाठी वापरल्याचं उघड झालं असलं तरी इतरही भरत्यांमध्ये याचा वापर होत असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळे प्रकल्पाग्रस्तांच्या बोगस प्रमाणपत्राचे धागेदोरे  इतर विभागांमध्येही पोहचे आहेत का याची चौकशी होण्याची गरज आहे.

तलाठी परीक्षेतही अनागोंदी
दरम्यान, नाशिक शहरातील दिंडोरी रोडवरील वेबइझी इन्फोटेक या परिक्षा केंद्रात पहिल्या टप्प्यातील तलाठी भरतीची परीक्षा (Exam) सुरु होती. यावेळी परीक्षा केंद्राच्या बाहेर असलेल्या एका दुकानात एक व्यक्ती संशयास्पद हालचाली करत असल्याचे नागरिकांना लक्षात आले. याची माहिती म्हसरूळ पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच म्हसरूळ पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर सापळा रचून संशयिताला ताब्यात घेतलं.

पोलिसांनी अटक केलेल्या गणेश गुसिंगे या संशयित आरोपीची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडून वॉकी टॉकी, दोन मोबाईल, हेडफोन, श्रवणयंत्र आणि एक टॅब, असं साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीसानी ताब्यात घेतलेल्या मोबाईल आणि टॅबमध्ये सुरु असलेल्या परीक्षेच्या प्रश्न पत्रिकेतील प्रश्नांची फोटो मिळून आले आहेत. पोलिसांनी संशयित आरोपी गणेश गुसिंगे, संगीता गुसिंगे, आणि सचिन नायमाने यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गणेश याची पोलिसांनी चौकशी केली असता संगीता गुसिंगे हिला मदत करत असल्याची माहिती त्याने दिली. तसंच सोबत सचिन नायमाने असल्याचे  त्याने पोलिसांना सांगितलं.