घराबाहेर गणपती मुर्ती ठेवली, पुण्यात ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला 5 लाख 62 हजार रुपयांचा दंड

Ganesh Murty Controvers: घराच्या बाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसविली म्हणून ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला 5 लाख 62 हजार रुपयांचा दंड सोसायटीने केला आहे.विशेष म्हणजे चक्क 20 वर्षानंतर हा दंड ठोठावण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी येथील फ्लाँवर व्हँली सहकारी गृहरचना सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Jul 16, 2023, 05:08 PM IST
घराबाहेर गणपती मुर्ती ठेवली, पुण्यात ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला 5 लाख 62 हजार रुपयांचा दंड  title=

सागर आव्हाड, झी 24 तास, पुणे: पुणे शहराचा गणेशोत्सव हे जगभर प्रसिद्ध असून गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातून लोक पुण्यात येत असतात.असं असलं तरी पुण्यातील घराच्या बाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसविली म्हणून ज्येष्ठ नागरिक दाम्पत्याला 5 लाख 62 हजार रुपयांचा दंड सोसायटीने केला आहे.विशेष म्हणजे चक्क 20 वर्षानंतर हा दंड ठोठावण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी येथील फ्लाँवर व्हँली सहकारी गृहरचना सोसायटीमध्ये ही घटना घडली आहे. 

पुण्यातील वानवडी येथे फ्लाँवर व्हँली सहकारी गृहरचना सोसायटी आहे. या सोसायटीत जवळपास 279 हून अधिक फ्लॅट धारक आहे. संध्या होनावर (६५) आणि त्यांचे पति सतिश होनावर (७२) या दोन्ही ज्येष्ठ दांपत्याने 2002 साली इथ सातव्या मजल्यावर घर खरेदी केलं. घर खरेदी केल्यावर त्यांनी वास्तूशांती केली. पुजाऱ्याने दोन्ही दाम्पत्याला घराच्या बाहेर मूर्ती बसवायला सांगितली. तेव्हा दोन्ही दांपत्याने 2002 साली घराबाहेर गणपती बाप्पाची मूर्ती बसविली. दरम्यान 2005 साली सोसायटी रजिस्टर करण्यात आली. 2019 ला सोसायटीवर नवीन कार्यकरणी आली आणि त्यानंतर नवे नियम आले.

नवीन आलेल्या कार्यकरणीने नवीन निर्णय घेतला. त्यानुसार 'सदनिकेच्या बाहेर सोसायटीची जागा असून त्याठिकाणी चप्पल स्टँड, झाडांच्या कुंड्या, अडगळी किंवा तत्सम सामान ठेवायचे नाही. ठेवल्यास शासनाच्या नियमानुसार महिन्याच्या टँक्सच्या पाच पट रक्कम दंड म्हणून वसूल करण्यात येईल.'

नियम लागू होताच कार्यकरणीने  2019 मध्ये होनावर यांना नोटीस पाठवली. तुम्ही देखील घराबाहेर बसविलेली गणपती बाप्पाची मूर्ती काढा असे सांगण्यात आले.पण होनावर यांनी ती मूर्ती काढली नाही आणि त्यांना आत्ता सोसायटीने गणपतीची मुर्ती बाहेर ठेवली म्हणून 5 लाख 62 हजार रुपये दंड ठाठावला आहे. जेव्हा नोटीस दिली तेव्हा पासून आम्ही न्यायालयीन लढाई लढत आहोत, असे होनवार यांनी झी 24 तासशी बोलताना सांगितले. 

आम्ही जे केल आहे ते चुकीचं नसून आम्ही घर घेतल्यापासून मूर्ती बसविली आहे.आत्ता हे लोक आमच्यावर दबाव आणत आहे. हे का करत आहे ते देखील माहीत नाही.पण जीव गेला तरी चालेल पण बाप्पांची मुर्ती ठेवल्या ठिकाणावरुन हलविणार नाही. मी ज्या मजल्यावर राहतो त्या ठिकाणी असलेल्या लोकांना मुर्तीचा ञास नाही. उलट ती लोक तेथे येऊन दिवा बत्ती करतात. मग सोसायटी बाँडीलाच का ञास वाटतो? असा प्रश्न जेष्ठ नागरिक सतिश होनावर यांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान फ्लाँवर व्हँली सोसायटीचे सेक्रेटरी कल्याण रामायण यांनी दिलेली प्रतिक्रियादेखील तितकीच महत्वाची आहे. 'आम्ही घेतलेला निर्णय गणेश मूर्तीच्या विरोधात नाही.आमच्या कमिटीने 2019 साली अनधिकृत बांधकामाच्या विरोधात कारवाई सुरु केली. सोसायटीतील 118 जणांनी इन्करोजमेंट केलं होत. यात कोणी घराबाहेरच्या जागेत फिश टॅंक लावलं होत तर कोणी बाहेरच्या जागेवर नवं काम केलं होतं, असे त्यांनी सांगितले.

सोसायटीची जनरल मीटिंगमध्ये 79 मेंबर्सनी या सर्वांच्या विरोधात कारवाई करा अन्यथा आम्हाला देखील परवानगी द्या असं सांगितलं.तेव्हा आम्ही या सर्वांच्या विरोधात तातडीने कारवाई सुरु केली. त्यानंतर 118 जणांपैकी 110 जणांनी त्यांच्या घराचं अनधिकृत काम काढून टाकल्याची माहिती सेक्रेटरींनी दिली. 

या गोष्टीला धार्मिक बाजू पुढे करून विरोध सुरु आहे. आमची देखील बाप्पावर श्रद्धा आहे. त्यांना जर श्रद्धा असेल तर त्यांनी बाप्पाची मूर्ती घरात बसवावी.आमचं काहीही म्हणणं नाही, असे सेक्रेटरी म्हणाले. 

आधीच्या लोकांनी कारवाई करायला पाहिजे होती पण ती झाली नाही.पण आत्ता आम्ही कायदेशीर मार्गाने दंड आकारलेला आहे. तसेच आमची बाजू देखील आम्ही न्यायालयात मांडत असल्याचं त्यांनी सांगितले.

एकूणच पुण्याच्या या फ्लाँवर व्हँली सोसायटीमध्ये बापाच्या मूर्तीवरून सुरू झालेला वाद हा न्यायालयात पोहचला असून न्यायालय आता या प्रकरणी काय निर्णय घेणार? याकडे आत्ता सर्वांचे लक्ष लागले आहे.