पुणेः आईसोबतचा 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; विसर्जन मिरवणुकीत गेलेल्या ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

Pune News Today: राज्यभरात गणेश विसर्जानाची धुम पहायला मिळत आहे. अशात गणेश विसर्जनाला गालबोट लागल्याची घटना पुण्यात घडली आहे. चार वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे.

मानसी क्षीरसागर | Updated: Sep 29, 2023, 05:18 PM IST
पुणेः आईसोबतचा 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; विसर्जन मिरवणुकीत गेलेल्या ४ वर्षांच्या मुलाचा मृत्यू title=
pune ganpati immersion 4 years old boy died after fell in water tank

कैलास पुरी, झी मीडिया

Pune News Today: पिंपरी चिंचवडसह पुण्यात गुरुवारी अनंत चतुर्दशीनिमित्त उत्साहाला उधाण आलं होतं. बाप्पाचे वाजत-गाजत गणेश विसर्जन करण्यात आले. पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये अनेक भव्य मिरवणुका काढत बाप्पाला निरोप देण्यात आला. मात्र, पिंपरी-चिंचवडमधील मोशी इथे गणपती विसर्जन सुरू उत्सवाला गालबोट लागल्याची घटना घडली आहे. पिंपरी-चिंचवडयेथे एका चार वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. चिमुकल्याचा पाण्याची टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुखःद घटना घडली आहे. अर्णव आशिष पाटील असं या चार वर्षांच्या मुलाचं नाव आहे. 

अर्णव पाटील हा मोशी येथील मंत्रा सोसायटीमध्ये राहत होता. गणेश विसर्जनाच्या दिवशी सोसायटीतील गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीसाठी तो आला होता. पाण्याच्या टाकीच्या शेजारी उभा राहून तो विसर्जनाची मिरवणूक पाहत होता. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. त्याचवेळी अर्णव पाण्याच्या टाकीत पडून त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. तोल गेल्याने अर्णव पाण्यात पडला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी घटना घडली तेव्हा सोसायटीच्या आवारात लेझीम नृत्य सुरू होते. लेझीमच्या ठेक्यावर सोसायटीतील सदस्य नाचत असतानाच अर्णव हा टाकीत पडला. सारेच मिरवणुकीत दंग असल्याने अर्णव टाकीत पडल्याचे कोण्याचाच लक्षात आलं नाही. यासंबंधी एक व्हिडिओही समोर आला आहे. तर, सोसायटीतील कार्यक्रमासाठी अर्णव छान तयार होऊन आला होता. अर्णव आणि त्याच्या आईनेसोबत सेल्फीही काढला होता. त्यांच्या हा सेल्फी अखेरचा ठरला आहे. अर्णवच्या मृत्यूमुळं परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्णव ज्या ठिकाणी उभा होता त्या पाण्याच्या टाकीला झाकण बसवले नव्हते किंवा पाण्याच्या टाकीच्या दुरुस्तीचे काम बाकी होते, असे प्रथमदर्शनी दिसत होते. पाण्याच्या टाकीवर झाकण नसल्याने अर्णव त्यात पडला व त्याचा बुडून मृत्यू झाला. 

नाशिकमध्येही विसर्जनाला गालबोट

गणेश विसर्जनासाठी गेलेले चार गणेश भक्त वाहून गेले आहेत. कर्जत मधील उक्रुळ येथे ही घटना घडलेय. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज न आल्याने भक्त वाहून गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एकूण चार जण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहून गेले. यापैकी एक सुखरुप बचावला आहे. एकाचा मृतदेह सापडला आहे. तर, दोन जण बेपत्ता असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींकडून मिळाली आहे. बेपत्ता गणेश भक्तांचा शोध सुरु आहे.