close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

धरणाच्या पाण्याखाली होते मंदीर, दुष्काळामुळे गावकऱ्यांना पुन्हा शिवदर्शन

पुणे जिल्ह्यातील चासकमान धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने धरणांमध्ये गेलेले 'वाडा' गाव आणि गावातील शिव मंदिर आता पुन्हा दिसू लागले आहे.

Updated: May 16, 2019, 02:34 PM IST
धरणाच्या पाण्याखाली होते मंदीर, दुष्काळामुळे गावकऱ्यांना पुन्हा शिवदर्शन

हेमंत चापुडे, झी मीडिया, पुणे : सध्याच्या दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील नागरिकांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. राज्यातील धरणांमधील पाणीसाठा कमी होत चालला आहे. अशातच पुणे जिल्ह्यातील चासकमान धरणातील पाणीसाठा संपुष्टात आल्याने धरणांमध्ये गेलेले 'वाडा' गाव आणि गावातील शिव मंदिर आता पुन्हा दिसू लागले आहे. 'जुनं ते सोनं' असं म्हटलं जातं आणि या जुन्या वास्तूतून जुन्या आठवणींना अनेक वर्षानंतर आता पुन्हा उजाळा मिळत आहे.

पुणे जिल्ह्यातील सह्याद्रीच्या कुशीत वाहणाऱ्या भीमा नदीच्या तीरावर वाडा नावाचे गाव वसले आहे. 1972 साली दुष्काळाचे संकट आल्यानंतर चासकमान हा जलाशय उभारण्यात आला. त्यानंतर हेच वाडा गाव आणि इतर गावे पाण्याखाली गेली. पाण्याखाली गेलेल्या वाडा गावची एकमेव आठवण म्हणून हे प्राचीन कालीन शिवमंदिर प्रसिद्ध आहे. 

 सध्या दुष्काळी परिस्थितीमुळे चासकमान धरणातील पाणीसाठा कमी झाल्याने पाण्याखाली गेलेले गाव आणि मंदिर पुन्हा दिसू लागले आहे. त्यामुळे या गावात राहणाऱ्या नागरिकांच्या जुन्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे. दुष्काळी संकटामुळे या गावच्या आठवणींना उजाळा मिळत असला तरी या परिसरातील गावांना पाणी टंचाईचे मोठे संकट उभे आहे. या ठिकाणी सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण कमी पाहायला मिळत आहे. त्यातच पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे धरणातील पाणीसाठा हा संपुष्टात आला आहे. 

वाडा हे गाव खेड तालुक्यात आहे. पश्चिम भागातील मुख्य बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे हे गाव होते. या गावची बाजारपेठ, गावची शाळा, यात्रेतील  उत्सव अशा अनेक गोष्टी नागरिकांच्या डोळ्यासमोर उभ्या राहतात. मात्र आता या जुन्या वाडा गावच्या आठवणीत फक्त प्राचीन शिवमंदिर उभे आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या आधारावर उभे असलेले हे मंदिर आजही गावकय्रांना आपल्या जुन्या आठवणींची साक्ष देत आहे.