Pune Airport Renamed: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यामधील वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भूमीपूजन सोहळ्यानिमित्त एक मोठी घोषणा केली आहे. पुण्यामध्ये आज वेगवेगळ्या राष्ट्रीय महामार्गांच्या भूमिपूजनाचा सोहळा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींच्या उपस्थितीमध्ये पार पडला. या कार्यक्रमाच्या वेळी भाषणादरम्यान फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली. विशेष म्हणजे केंद्रात मंत्री असलेल्या गडकरींनीही फडणवीसांनी केलेल्या विधानाचा संदर्भ देत सदर मंजूरी मिळवणारच असं आश्वासन दिलं.
देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणामध्ये, पुण्यातील नुतनीकृत लोहगाव विमानतळाचे नामकरण करण्यास मंत्रिमंडळाकडून मंजुरी दिली जाईल असं जाहीर केलं. पुण्यातील नुतनीकृत लोहगाव विमानतळाचे नामकरण जगद्गुरु संत तुकाराम महाराज विमानतळ असे करणार असल्याचं फडणवीस म्हणाले. केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेचे स्वागत करत फडणवीसांनी हा निर्णय जाहीर केला आहे. "राज्याच्या कॅबिनेटमध्ये मंजुरी घेऊन प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार आहोत," असं फडणवीस जाहीर भाषणात म्हणाले.
पुण्यातील मेट्रो आणि विमानतळाचा प्रश्न गेली कित्येक वर्षे प्रलंबित होता. तो मार्गी लागला याचा आनंद आहे, असं नितीन गडकरी आपल्या भाषणामध्ये म्हणाले. तसेच पुढे बोलताना गडकरींनीही लोहगाव विमानतळाचा उल्लेख केला. "लोहगाव विमानतळाला संत तुकाराम महाराजांचे नाव देण्याचा प्रस्ताव मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे. आम्ही केंद्रात पंतप्रधांनाकडून हा प्रस्ताव मंजूर करून घेतल्याशिवाय राहणार नाही," असं गडकरी म्हणाले.
नक्की वाचा >> ₹1900 कोटींचा रस्ता बांधला मग ₹8000 कोटींची टोलवसुली का? गडकरी म्हणाले, 'तुम्ही कार..'
गडकरींनी यावेळेस बोलताना, "मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे कात्रजपासून सुरू करणे आवश्यक होते. पण अधिकाऱ्यांनी ते होऊ दिले नाही. ती माझी चूक झाली," असंही म्हटलं आहे. तसेच गडकरींनी आता पुणे-सातारा रस्त्यासाठी नव्याने कंत्राट दिलं जाणार असल्याचं जाहीर केलं. "पुणे-सातारा रस्त्याचे सध्याचे कंत्राट रद्द करणार असून 5000 कोटींचे नवीन काम हाती घेणार आहोत. पुणे-सातारा एलिव्हेटेड रोडचा आराखडा मंजूर झालेला आहे," असं गडकरींनी सांगितलं.
नक्की वाचा >> 'कितीही परखड बोललं तरी राजाने ते सहन केलं पाहिजे, लोकशाहीत...'; गडकरींचं सूचक विधान
पुणे जिल्ह्यात डिसेंबर अखेरपर्यंत दीड लाख कोटींची कामे सुरू होतील. पुणे ते संभाजीनगर 2 तासांत जाता येईल असा रस्ता करणार. आखणी झालेली आहे, असंही गडकरी म्हणाले. तर देवेंद्र फडणवीस यांनी, "पुण्यातील पालखी मार्गाचे 70 ते 80 टक्के काम पूर्ण झाल्याचं सांगतानाच आज शेवटच्या टप्प्याचा शुभारंभ होत आहे. लवकरच संपूर्ण मार्गाचे काम पूर्णत्वाला येईल. त्याबद्दल गडकरीजींना धन्यवाद देतो," असं म्हणत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्र्यांचे आभार मानले.