पुणे : कृषीसेवक भरती परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झालेल्या ७३० कृषी सेवकांना कृषी विभागात रूजू होता येणार आहे. कारण मॅटने म्हणजेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने राज्य सरकारचा कृषीसेवक भरती परीक्षा रद्द करण्याचा निर्णय गुरूवारी रद्द केला आहे.
इतकेच नाहीतर परीक्षेच्या गुणवत्ता यादीत निवड झालेल्या ७३० कृषी सेवकांना रूजू करून घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेली कित्येक महिन्यांपासून निकालाची वाट पाहणा-या निवड झालेल्या ७३० कृषी सेवकांना दिलासा मिळाला आहे.
कृषी आयुक्तालयातर्फे घेण्यात कृषिसेवक पदांसाठीच्या लेखी परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परीक्षा रद्द करण्याचे आदेश दिले होते. तसेच राज्य सरकारने परीक्षा रद्द करून परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांची भारांकन पद्धतीने कृषीसेवक पदासाठी निवड करण्याचे आदेश दिले.
दरम्यान, भारांकन पद्धत रद्द करण्यासाठी उमेदवारांनी मॅटमध्ये याचिका दाखल केली होती. मॅटमध्ये गुरूवारी अंतिम झालेल्या सुनावणीत कृषीसेवक भरती परीक्षा रद्द करण्याचा राज्य सरकारचा निर्णय रद्द केला आहे.