पक्षबांधणी सुरु असतानाच राज ठाकरेंना मोठा धक्का; तब्बल 400 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

MNS : राज ठाकरे कोकणात पक्षबांधणीत व्यस्त असताना मनसेला मोठा धक्का बसलाय. तब्बल 400 पदाधिकाऱ्यांनी एकाच वेळी पक्षाला रामराम ठोकलाय

Updated: Dec 5, 2022, 10:10 AM IST
पक्षबांधणी सुरु असतानाच राज ठाकरेंना मोठा धक्का; तब्बल 400 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
(फोटो सौजन्य - PTI)

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) सध्या कोकण दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या बांधणीसह पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन करण्याचे काम राज ठाकरे करत आहेत. एकीकडे पक्षबांधणी करत असताना राज ठाकरेंना मोठा धक्का बसलाय. पुण्यात मनसेला (Pune MNS) मोठं खिंडार पडलं आहे. एकीकडे मनसेचे पुण्यातील फायरब्रँड नेते वसंत मोरे (Vasant More) नाराज असल्याची चर्चा असताना त्यांच्याच समर्थकाने पक्षाला रामराम ठोकला आहे. निलेश माझिरे (Nilesh Mazire Left Party) यांना पदावरून काढून टाकल्यानंतर त्यांनी पदाचा राजीनामा दिलाय. माझिरे यांच्या राजीनाम्यानंतर तब्बल 400 पदाधिकाऱ्यांनी मनसेची साथ सोडली आहे.

400 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे

मनसे जिल्हाध्यक्ष निलेश माझीरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माथाडी जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी केल्यानंतर त्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. निलेश माझिरे यांच्या बरोबर 400 कार्यत्यानी पण राजीनामे दिले आहेत. राज ठाकरे यांच्या आदेशानंतरच माझिरे यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर नाराज असलेल्या माझिरे यांनी पदाचा राजीनामा दिला. मनसे नेते शिरीष सावंत यांनी याबाबत प्रसिद्धीपत्रक काढून पदावरुन काढून टाकल्याची माहिती दिली. याआधीसुद्धा माझिरे यांनी अंतर्गत राजकारणाला कंटाळून नाराजी व्यक्त केली होती. मात्र त्यावेळी राज ठाकरेंनी समजूत काढल्यानंतर त्यांनी पक्ष न सोडण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता माझिरे यांना पदावरून काढून टाकल्यानंतर ते पुन्हा नाराज झाले आणि त्यांनी राजीनामा दिला.

हे ही वाचा >> 'तात्या कधी येताय... वाट पाहतोय', अजितदादांची वसंत मोरे यांना खुली ऑफर!

 

वसंत मोरेंचे समर्थक असल्याचा ठपका

माझ्या पडत्या काळात तुम्ही माझ्याबरोबर खंबीरपणे उभे राहिलात त्यांना मी कधीच विसरणार नाही, असे निलेश माझिरे यांनी म्हटले आहे. पुणे जिल्ह्यातील माथाडी कामगार महाराष्ट्र निर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष पद माझिरे यांच्याकडे होतं. पण गेले काही दिवस मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत वादाचा फटका माझिरे यांना बसला. वसंत मोरे यांचे समर्थक म्हणून माझिरे यांच्यावर ठपका ठेवला गेला होता. पदावरून हकलपट्टी केल्यानंतर माझिरे यांनी सदस्य पदाचाही राजीनामा दिला आहे. तसेच जिल्हाभरातील समर्थकांनीही माझिरे यांना पाठिंबा दर्शवला आहे.

वसंत मोरेंना राष्ट्रवादीकडून खुली ऑफर

राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक असलेले वसंत मोरे यांनी अनेकदा पक्षाच्या शहर कोअर कमिटीच्या कार्यपद्धतीवर उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी राष्ट्रवादीत (NCP) येण्याची थेट ऑफर दिली आहे. एका लग्नसोहळ्यात वसंत मोरे यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी अजित पवार आणि वसंत मोरे यांची भेट झाली. भेटीवेळी अजित पवारांनी थेट वसंत मोरे यांना राष्ट्रवादीत (NCP Pune) येण्याची ऑफर दिली. तात्या कधी येता... वाट पाहतोय, असं अजित पवार म्हणाले.