पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Mns Chief Raj Thackeray) गुढीपाडवा मेळाव्यातील सभेत मशिदीवरील भोंगे उतरविले नाही तर स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले होते. यावर पुण्याचे मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे (Vasant More) यांनी आदेशाविरोधात भूमिका घेत आपल्या भागात भोंगे हटवणार नाही, हनुमान चालिसा लावणार नाही अशी भूमिका घेतली होती.
त्यानतंर आज अचानक पुणे शहराध्यक्षपदावरुन वसंत मोरे यांची उचलबांगडी करण्यात आली असून साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे भोंगा प्रकरणावरुन मनसेमध्ये तिढा वाढल्याचं बोललं जात आहे.
या प्रकरणावर वसंत मोरे यांनी झी 24 तासला पहिली प्रतिक्रिया दिली आहे. आपली हकालपट्टी करण्यात आलेली नाही. गेल्या महिन्यात राज ठाकरे पुण्यात आले होते. त्याचवेळी मी सांगितलं होतं की मी मे महिन्यापर्यंत शहराध्यक्ष पदावर राहिन असं स्पष्टीकरण दिलं आहे. ज्यावेळी शहराध्यक्षपदावर नियुक्ती झाली त्याचवेळी मी राज ठाकरे यांना सांगितलं होतं, निवडणुकीनंतर मला शहराध्यक्षपद नको आहे असं त्यांनी म्हटलं.
गेले वर्षभर मी या पदावर असताना शहरात जे काही वातावरण पाहिलं आहे, काही लोकांना पक्ष शहरात वाढू नये असं वाटतं, या गोष्टीचा मला त्रास होत होता, पण मी राज ठाकरे यांना सांगितलं होतं की कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी शंभर टक्के मनसैनिक आहे.
ज्यावेळी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली त्या दिवशीही मी राज ठाकरे यांच्याबरोबर कृष्णकुंजवर होतो. जेव्हा पक्षाला नाव नव्हतं, तेव्हाही मी माझ्या गाडीवर राज समर्थक असं लिहित होतो. त्यामुळे मी पक्ष सोडणार नाही असं वसंत मोरे यांनी स्पष्ट केलं आहे.
शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची शहाराध्यक्षपदी नेमणूक झालेली आहे. साईनाथ बाबर हा माझा राजकीय वारसदार आहे. ते ही जबाबादारी शंभर टक्के सांभाळू शकतील. साईनाथ आणि माझी 2000 सालापासूनची आहे अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
खूप ऑफर आल्या गेल्या दोन दिवसात, पण मी कडवट मनसैनिक आहे. कोणत्याही परिस्थितीत माझ्याकडून असे निर्णय होणार नाहीत, मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. राज ठाकरे यांनी जो आदेश दिला आहे त्याचं पालन करेन असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.
ही हकालपट्टी नाहीए, ही वैचारिक लढाई आहे. मी आधीपासून सांगतोय की मी लोकप्रतिनिधी आहे, त्यामुळे भोंगा प्रकरणावर मी लोकप्रतिनिधी म्हणून माझी भावना व्यक्त केली होती. पण राज ठाकरे माझ्याशी फारकत घेतील असं वाटत नाही.
मला आजच्या बैठकीचा कोणताच निरोप नव्हता. मनसेच्या प्रत्येक कार्यकर्त्यांना मी संयम बाळगण्याचं आवाहन करतो. महाराष्ट्रातील मनसेचा पहिला बॅच राज ठाकरे यांनी माझ्या छातीवर लावला आणि त्याचा मला अभिमान आहे, असं वसंत मोरे यांनी म्हटलं आहे.