निलेश खरमरे, झी मीडिया, पुणे : Pune News : बांधकाम किंवा निर्माणाधीन इमारतींच्या कामादरम्यान बरेच अपघात घडतात. अशीच एक अप्रिय घटना पुण्यात घडली असून, त्यात एका चिमुकलीचा मृत्यू ओढावला आहे. पुण्याच्या भोर तालुक्यातील किकवी गावात विटभट्टीवर बांधण्यात आलेली पाण्याची टाकी फुटून टाकीची भिंत अंगावर कोसळल्यामुळं तीन वर्ष वयाच्या चिमुरडीचा मृत्यु झाला आहे. तर, या अपघातामध्ये एक 13 वर्षीय मुलगी गंभीर जखमी झाल्याचं वृत्त समोर आलं आहे.
विद्या पांगु जाधव असं मृत मुलीचं मुलीचं नाव. लक्ष्मी गोविंद वाघमारे असं या अपघातातील गंभीरित्या जखमी मुलीचं नाव आहे. सदर विटभट्टीतं नव्याने बांधलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी भरण्याचे काम चालु असतानाच अचानक टाकी फुटून टाकीच्या सर्व भिंती कोसळल्या. ज्यानंतर राजगड पोलीस ठाण्यात या अकस्मिक मृत्युची नोंद करत या घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांकडून ही माहिती मिळताच घटनेचा पुढील तपास सुरु करण्यात आला.
घटनेची माहिती मिळताच विटभट्टीवरील कामगार तातडीनं घटनास्थळी जमा झाले. तेथे राहणारे जागेचे मालक गणेश दत्तात्रय भिलारे यांनी तातडीने रुग्णवाहीका बोलावून या दोन्ही मुलींना रुग्णालयात पाठवले. परंतू लहान विद्याचा उपचारापुर्वीच मृत्यू झाला होता. तर लक्ष्मीवर येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.