सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : शाळेच्या मनमानीची एक धक्कादायक घटना पुण्यात (Pune) घडली आहे. शाळेचीच बस (School Bus) वापरावी या हट्टासाठी खासगी व्हॅननं (Private Van) शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना चक्क व्हॅनमध्येच बसवून ठेवण्यात आलं. या विद्यार्थ्यांची व्हॅन शाळेच्या गेटवरच थांबवण्यात आली. पुण्यातील वाघोलीतल्या रायझिंग स्टार (Rising Star School) या शाळेत हा प्रकार घडलाय. सकाळी खासगी व्हॅनमधून जेव्हा विद्यार्थी (Student) शाळेत आले, तेव्हा त्यांची व्हॅन शाळेच्या गेटवरच थांबवण्यात आली. त्यांना शाळेत प्रवेश देण्यात आला नाही. विद्यार्थी घाबरुन रडू लागले. त्यानंतर या विद्यार्थ्यांचे पालक शाळेत पोहोचले. विद्यार्थ्यांना शाळेत येण्यासाठी आमचीच बस वापरावी लागेल, अशी जबरदस्ती शाळा प्रशासनानं केली. अखेर संतापलेल्या पालकांनी लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये शाळेविरोधात तक्रार दाखल केली.
नेमकं काय झालं?
आज सकाळी रायसिंग स्टार स्कूलच्या विद्यार्थ्यांच्या व्हॅनला शाळेत प्रवेश न देता विद्यार्थ्यांना गेटवरच थांबविण्यात आलं. त्यामुळे विद्यार्थी घाबरत रडू लागले त्यानंतर पालक तिथे आले असता, शाळेने त्यांना वाहतुकीसाठी शाळेचीच बसच वापरावी लागेल, खासगी वाहतूक चालणार नाही, असं सांगितलं. शाळेची बस फी जास्त असल्यामुळे काही पालकांनी विद्यार्थ्यांना खासगी व्हॅन लावल्या आहेत. वह्या, पुस्तके, गणवेश, शाळेतून खरेदी करायची शाळेने बंधनकारक केलं आहे. त्यातच आता वाहतूक सेवा ही शाळेचीच घ्यावी लागेल असं सांगत पालकांचे आर्थिक शोषण केलं जात आहे.
"फी भरली नाही म्हणून...'
त्याआधी पुण्यातील राजगुरुनगर (Rajguru Nagar) इथं शाळेच्या पहिल्याच दिवशी एका शाळेने विद्यार्थ्यांना बाहेर बसवल्याचा प्रकार घडला होता. 15 जूनला राज्यात शाळा सुरु झाल्या. काही शाळांमध्ये गुलाब पु्ष्प देऊन तर काही शाळांमध्ये बैलगाडीवरुन मिरवणूक काढून विद्यार्थ्यांचं स्वागत करतण्यात आलं. पण राजगुरुनगरमधल्या खेड तालुका एज्युकेशन सोसायटीच्या शेठ केशरचंद पारख या इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना वाईट अनुभव आला.
शाळेतील काही विद्यार्थ्यांनी चालु वर्षाची फी भरली नव्हती. त्यामुळे शाळेच्या पहिल्याच दिवशी फी न भरणाऱ्या विद्यार्थ्यांना थेट शाळेच्या व्हरांड्यात बसवण्यात आलं.या घटनेची माहिती मिळताच मनसेने आक्रमक पवित्रा घेत शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकाऱ्यांना धारेवर धरलं. त्यानंतर एका तासाने विद्यार्थ्यांना वर्गात घेण्यात आलं.
खासगी शाळेवर बुलडोझर
दरम्यान, पुण्यात वारजे परिसरातील एका खाजगी शाळेवर बुलडोझर चालवण्यात आलाय. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्यच अंधारात आलंय. वारजे परिसरातील तब्बल तीस वर्ष जुनी चार मजली इमारत जमीनदोस्त करण्यात आली.. यासंबंधी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय..