'सरकार निष्काळजी, हिंजवडी आयटी पार्कसाठी...', सुप्रिया सुळेंची सरकारवर सडकून टीका

Supriya Sule On Hinjewadi IT Park : हिंजवडीमधील आयटी कंपन्या  (Hinjewadi IT Park) आता बोजा बिस्तारा गुंडाळून महाराष्ट्राबाहेर जात आहेत. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात टीका होताना दिसते. अशातच सुप्रिया सुळे यांनी देखील सरकारला निशाण्यावर घेतलंय.

सौरभ तळेकर | Updated: May 30, 2024, 04:34 PM IST
'सरकार निष्काळजी, हिंजवडी आयटी पार्कसाठी...', सुप्रिया सुळेंची सरकारवर सडकून टीका title=
Supriya Sule criticized government Over Migration of 37 IT companies from Hinjewadi

Pune Hinjewadi Latest News : आयटी हब म्हणून उभं असलेल्या हिंडवजीच्या आयटी पार्कवर (Hinjewadi IT Park)  आता अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलाय. दररोजच्या ट्रॅफिक जामला (Trafic jam) कंटाळून जवळपास 37 कंपन्या स्थलांतरीत झाल्या आहेत. तर आणखी काही कंपन्या राज्याबाहेर जाण्याच्या मार्गावर आहे. झी 24 तासने जेव्हा उद्योगमंत्र्यांचं लक्ष झी 24 तासनं वेधलं, तेव्हा माहिती घेतो, असं उत्तर उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलंय. त्यामुळे आता रोजगाराच्या मुद्द्यावर सरकार कोणतं पाऊल उचलतंय? असा प्रश्न सध्या विचारला जातोय. अशातच आता झी 24 तासच्या बातमीची सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी दखल घेतली अन् सरकारवर निशाणा साधला आहे. 

काय म्हणाल्या Supriya Sule ?

महाराष्ट्राच्या हक्काचे रोजगार एकामागून एक बाहेर जात असताना राज्य सरकार केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. यापुर्वीही महत्वाचे उद्योग बाहेर गेले, तरुणांच्या हक्काचा रोजगार हिरावून घेतला गेला. परंतु सरकारला याबाबतीत लक्ष घालायला वेळ नाही, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्यावेळी त्यांनी झी 24 तासने पाठपुरावा केलेल्या हिंजवडीच्या बातमीवर सरकारचं लक्ष वेधलं.

आता पुण्यातील हिंजवडी आयटी पार्कमधून 37 कंपन्या बाहेर गेल्याचे समोर आले आहे. एक उद्योग बाहेर जातो तेव्हा त्यासोबत रोजगार आणि तरुणांचे भविष्य देखील संकटात येतात. महाराष्ट्रातील तरुणाई रोजगाराच्या शोधासाठी पायपीट करीत असून या परिस्थितीला उद्योग टिकवून ठेवण्याबाबत निष्काळजी असणारे हे शासन कारणीभूत आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

 

दरम्यान, हिंजवडीतील 37 कंपन्या राज्याबाहेर चालल्याच्या झी २४ तासच्या बातमीची उद्धव ठाकरे गटाकडून दखल घेण्यात आली आहे. उद्योग राज्याबाहेर चाललेत, सरकार स्वस्थ बसलंय,  हा सरकारचा निव्वळ निष्क्रियपणा आहे. तरुणांचं भविष्य दावणीला बांधून सरकार सत्तेचा मलिदा खाण्यात मग्न आहे, असा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.