आजी-आजोबांसाठीही आता 'पाळणाघर', उतारवयातील एकटेपणा घालवणारं ठिकाणं

 उतारवयात एकटेपणा घालण्यासाठी हे उत्तम ठिकाण

Updated: Jan 20, 2021, 04:17 PM IST
आजी-आजोबांसाठीही आता 'पाळणाघर', उतारवयातील एकटेपणा घालवणारं ठिकाणं title=

किरण ताजणे, झी २४ तास, पुणे : लहान मुलांच्या संगोपनासाठी, देखभालीसाठी, पालकांना पाळणाघरांचा मोठा आधार असतो. घरातल्या वृद्धांचंही काहीसं तसंच असतं. नवरा-बायको नोकरी करत असतील तर त्यांच्या देखभालीची अडचण होते. पुण्यात यावर एक चांगला पर्याय उपलब्ध झालाय. पुण्यातल्या 'रेनबो डे केअर सेंटर'मधे आजी-आजोबा आनंदाने राहताना दिसतायत. लहान मुलांसाठी पाळणाघरं असतात तर ज्येष्ठ नागरिकांसाठी 'वृद्धाश्रम'. मात्र या दोन्हीची सांगड घातल अनुराधा करकरे यांनी वृद्धांसाठी हे पाळणाघर सुरू केलंय. उतारवयात एकटेपणा घालण्यासाठी हे उत्तम ठिकाण ठरतंय. 

सकाळी 9 ते संध्याकाळी 5 या वेळेत ज्येष्ठ नागरिक इथं येतात.
नाश्ता-जेवण, चहापाणी, वाचन, प्रार्थना, गप्पा-टप्पा, समुपदेशन, योगासनं अशी धम्मालमस्ती सुरू असते. ज्येष्ठांसाठी डान्स-म्युझिक थेरपी, लघुपट, वादन- गायन असे कार्यक्रमही होतात. 

या सगळ्याचा कंटाळा आला तर टाईमपासला कॅरम, पत्ते, पेंटिंग आहेच... या आजी-आजोबांना सांभाळण्यासाठी इथं 12 जण आहेत. सकाळी घरून आणण्यापासून ते परत नेऊन सोडण्यापर्यंतचा हा हसता-खेळता प्रवास असतो... 

वृद्धापकाळामुळे हिरावला गेलेला आनंद या सेंटरमुळे परत मिळालाय. महिन्याला अंदाजे 15 हजार शुल्क घेतलं जातं. सध्या 12 जण इथं येतायत. अनेक जण विचारणाही करतायत. उतरवायत असलेली मायेची गरज इथं पूर्ण होतेय, हे या आजोबांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहूनच समजतं. 

समवस्क मित्रांचा अड्डा जमल्यानं इथं रोज धमाल असते. आपलं आयुष्य ओझं न मानता आनंदात जगायला हे आजी-आजोबा नव्यानं शिकतायत. या रेनबो डे केअर सेंटरनं त्यांच्या आयुष्यात खरोखरच सप्तरंग फुलवलेत.