पुणे : एकीकडे पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असतानाच पुण्यातील विमानगरमधील दत्त मंदिर चौकात पाण्याची पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया गेलं. आज सकाळची ही घटना आहे. पाईपलाईन फुटल्यानं रस्त्यावर कारंजे उडत असल्याचं दृश्य पाहायला मिळालं. पुण्यामध्ये आधीच पाणी संकट आहे. नगर रोड परिसरात तर पाण्याची टंचाई आहे. त्यातच आज शहरातील पाणीपुरवठा देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली बंद ठेवण्यात आलाय. असं असताना पाईपलाईन फुटून पाणी वाया जाणं ही गंभीर बाब आहे.
उल्लेखनीय म्हणजे, पुण्यात पाणीसंघर्ष उद्भवण्याची परिस्थिती असताना अशा पद्धतीनं पाणी वाया जाणं ही काही नवी गोष्ट नाही. खडकवासला धरणातील पाणी येत्या जुलैपर्यंत पुरेल इतकाच उरल्याचं सागंण्यात येतंय. खडकवासला प्रकल्पातील टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या धरणांतून सिंचनासोबतच शहराला पाणीपुरवठा केला जातो. सध्या, कात्रज, धनकवडी, कोंढवा, अप्पर इंदिरानगर, धायरी, वडगाव शेरी यांसह शहरालगतच्या काही भागांत पाणीटंचाई जाणवत आहे.