पुण्यातील लवासात पीएम मोदींचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारणार? पाहा किती असणार उंची

पुण्यात लवासा इथं पंतप्रधान मोदींचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. जवळ 190 ते 200 मीटर उंचीचा हा मोदींचा पुतळा असेल. डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रा ही कंपनी मोदींचा अतिभव्य पुतळा बनवणार आहे. 31 डिसेंबर 2023 आधी या पुतळ्याचं अनावरण होण्याची शक्यता आहे.   

राजीव कासले | Updated: Aug 2, 2023, 02:53 PM IST
पुण्यातील लवासात पीएम मोदींचा जगातला सर्वात उंच पुतळा उभारणार? पाहा किती असणार उंची title=

PM Modi Statue in Lavasa : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी मंगळारी पुणे दौरा केला. पुण्यात पीएम मोदी यांचा लोकमान्य टिळक पुरस्काराने सन्मान करण्यात आला. त्यानंतर त्यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातीलच पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांचं लोकार्पण करण्यात आलं. तसंच पंतप्रधान आवास योजनेतील घरांचं लोकार्पणही पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आलं. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं बांधलेली 1280 घरं तसंच पुणे महापालिकेनं बांधलेली 2650 घरांचं लोकार्पण मोदींनी केलं.. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या 6400 हून अधिक घरांची पायाभरणीही मोदींच्या हस्ते झाली.

पुणेकरांना आणखी एक भेट
आता पुणेकरांना आणखी एक भेट मिळणार आहे. पर्यटकांचं आकर्षण असलेल्या लवासात  (Lavasa) पंतप्रधान मोदींचा पुतळा (PM Modi Statue) उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. जगातील हा सर्वात उंच पुतळा असेल आणि याची उंची जवळवास 190-200 मीटर उंच असेल अशी माहिती मिळेतय. डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रा (DPIL) ही कंपनी मोदींचा अतिभव्य पुतळा बनवणार आहे. 31 डिसेंबर 2023 आधी या पुतळ्याचं अनावरण होण्याची शक्यता आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमात जर्मनी, इस्त्रायल, फ्रांस, संयुक्त अरब अमीरात आणि अमेरिकचे राजदूतााचा सहभाग असेल अशी माहितीही मिळतेय. 

हा पुतळा पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाला आणि देशात अखंड एकात्मतेसाठी होत असलेल्या प्रयत्नांना समर्पित असेल असं सांगितलं जात आहे. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलने (NCLT) डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुप ऑफ कंपनीला (DPGC) लवासा स्मार्ट सिटीसाठी संकल्प योजना मंजूर केली आहे. त्यामुळे आता पीएम मोदींच्या पुतळ्याची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याची  शक्यता आहे. 

डीपीआयएलचे अध्यक्ष अजय हरिनाथ सिंह  यांनी दिलेल्या माहितीनुसार लवासात जिथे पीएम मोदींचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे,  त्याठिकाणी भारताचा वारसा आणि नवीन भारताच्या आकांक्षा दर्शवणारं एक संग्रहालय, एक स्मारक उद्यान, मनोरंजन केंद्र आणि एक प्रदर्शन हॉल निर्माण करण्यात येईल. प्रदर्शन हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन आणि कर्तृत्वाची झलक पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लवासामधील हा पुतळा पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. 

याआधी सोन्याची मूर्ती
याआधी गुजरातमधल्या एका सोनाराने पीएम मोदी यांची सोन्याची मूर्ती बनवली होती. गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या ऐतिहासिक विजयामुळे आनंदित झालेल्या सूरत मधल्या वसंत बोहरा नावाच्या व्यापाऱ्याने ही सोन्याची मूर्ती बनवली होती. पीएम मोदी यांची ही मूर्ती 156 ग्राम वजनाची आहे. या सोन्याच्या मूर्तीची किंमत जवळपास 11 लाख रुपये इतकी असल्याचं सांगितलं जातंय. त्याआधीही अहमदाबाद आणि इंदोरमधल्या व्यापाऱ्यांनी पीएम मोदी यांची सोन्याची मूर्ती बनवल्या आहेत. याच वर्षाच्या सुरुवातील मेरठमधल्या सरावा व्यापाऱ्यांनी पीएम मोदी यांचा फोटो असलेले सोनेचे शिक्के तयार केले होते.