स्वत:च्या गुन्ह्यांवर कथा लिहिणारा लेखक, फिल्मी लेखकाचा हायप्रोफाईल लोकांना गंडा

गुन्हेगारी कथा वाचून किंवा क्राईम सीरियल्स पाहून गुन्हे करायला प्रवृत्त झाल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत.

Updated: Feb 22, 2022, 10:50 PM IST
स्वत:च्या गुन्ह्यांवर कथा लिहिणारा लेखक, फिल्मी लेखकाचा हायप्रोफाईल लोकांना गंडा title=

सागर आव्हाड, झी 24 तास, पुणे :  गुन्हेगारी कथा वाचून किंवा क्राईम सीरियल्स पाहून गुन्हे करायला प्रवृत्त झाल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली आहेत. पण पुणे पोलिसांनी चक्क एका अशा गुन्हेगाराला अटक केलीय जो आधी गुन्हा करायचा आणि मग स्वत:च त्याची स्टोरी लिहायचा. मात्र या फिल्मी लेखकाचा अखेर पर्दाफाश झाला आहे. नक्की हे संपूर्ण प्रकरण आहे हे आपण जाणून घेऊयात. (pune police arrest to story writer  anup manore who cheted to high profile people) 

सिनेमा पाहून किंवा एखादी क्राईम स्टोरी वाचून गुन्हा करणारे कमी नाहीत. प्रत्येक गुन्हेगाराच्या मागे कुठली तरी फिल्मी कहाणी असतेच असते. पण पुण्यातल्या एका  सराईत गुन्हेगाराची कहाणी जरा वेगळी आहे. हा काही साधासुधा गुन्हेगार नाही. नाव अनुप मनोरे, पेशानं लेखक, पण रूपं दोन.

अगदी एखाद्या थरार कथेमध्ये शोभतील अशी. पहिल्या रूपात तो मराठी, हिंदी, इंग्रजीत लिखाण करणारा लेखक आहे. मराठी चित्रपटसृष्टीतल्या बड्या कलाकारांसोबत त्याची उठबस आहे. 

एखाद्या यशस्वी कलाकाराचं चकचकीत आयुष्य तो जगत आलाय. मात्र याच अनुप मनोरेचं दुसरं रूप तेवढंच भयानक आहे. हायप्रोफाईल महिलांशी शरीर संबंध प्रस्थापित करून देतो असं सांगत त्यानं अनेकांना लाखोंचा गंडा घातलाय. पुण्यातील एका 76 वर्षांच्या व्यावसायिकाची फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आल्यानंतर त्याचं बिंग फुटलंय. 

फसवणुकीसाठी अनुपनं गणेश शेलार असं नाव धारण केलं. त्यानं निवडलेला मार्ग शरलॉक होम्स किंवा व्योमकेश बक्षींच्या कथेला साजेसा असाच. 'एंजॉय करा आणि हजारो रुपये कमवा', 'मीनाक्षी फ्रेंडशिप क्लब', 'रोड टू हेवन' अशा शीर्षकांसह तो वृत्तपत्रांमध्ये जाहिरात द्यायचा.

जाहिरात पाहून फोन करणाऱ्या पुरूषांना हाय प्रोफाईल महिलांशी मिटिंग करून देतो असं सांगायचा. एखाद्या महिलेचं व्हर्च्युअल अकाऊंट तयार करून समोरच्या पुरूषाशी संपर्क करायचा. त्यांच्याकडून येणारे पैसे स्वीकारण्यासाठी एखाद्या महिलेच्या नावावर असलेल्या बँक अकाऊंटचा उपयोग करायचा. 

अनुपला फसवणुकीची कल्पना मित्राच्या एका कथेतून सुचली. पुढं या कथेत त्यानं स्वत:ची भर घातली. फसवणुकीचं जाळं विणताना त्यानं अनेक महिलांना सोबत घेतलं. महिलांसाठी नोकरीची संधी अशी जाहिरात देऊन अनेक महिलांचे कागदपत्र मिळवले. 

त्याआधारेच बँक अकाऊंट ओपन करायचा. बदल्यात त्या महिलांना पाच हजार रूपये दिले जायचे. अनुप मनोरेनं उभारलेल्या या मायावी दुनियेचा अखेर पर्दाफाश झालाय. पोलिसांनी त्याच्यासोबत दीपाली शिंदे नावाच्या महिलेला अटक केलीय. गेल्या दहा वर्षांपासून तो जी कथा लिहित होता त्या कथेचा शेवट आता त्याच्या अटकेनं झालाय.