बिर्याणी खाल, जीवानं जाल? चिकन बिर्याणीने घेतला तरुणाचा बळी?

चिकन बिर्याणी खाताय? सावधान ! चिकन बिर्याणी प्रेमींसाठी महत्त्वाची बातमी, ही बातमी पाहिल्यावर तुम्ही बिर्याणी मागवण्याआधी 10 वेळ विचार कराल

Updated: Feb 22, 2022, 08:39 PM IST
बिर्याणी खाल, जीवानं जाल? चिकन बिर्याणीने घेतला तरुणाचा बळी? title=
प्रातिनिधिक फोटो

विशाल करोळे झी 24 तास औरंगाबाद : बिर्याणी म्हटलं तर कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल पण, ही बातमी पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटणं सोडा; उलट बिर्याणी खाताना तुम्ही 100 वेळा विचार कराल. कारण, बिर्याणी खाणं एका तरुणाच्या जीवावर बेतलं आहे. असं काय झालं या तरुणासोबत? 

ताटातल्या याच चमचमीत बिर्याणीमुळे 25 वर्षीय तरुणानं जीव गमावल्याची चर्चा आहे. हे ऐकून खरं वाटणार नाही मात्र, औरंगाबादच्या वाळूजमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. सचिन नावाच्या या तरुणानं आपल्यासाठी आणि भावासाठी बिर्याणी आणली होती.

दोघांनी बिर्याणीवर मनसोक्त तावही मारला. पोटभर बिर्याणी खाल्ल्यानंतर दोघांच्याही पोटात दुखू लागलं. सचिनच्या पोटात जरा जास्त दुखू लागलं. दोघांवर उपचारही करण्यात आले पण, सचिनची तब्येत इतकी खालावली की त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. बिर्याणीतून विषबाधा झाली असावी असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

या तरुणाच्या मृत्यूचं कारण काय असू शकतं?
- शिळी बिर्याणी खाल्ल्यानं पोटात इन्फेक्शन झालं असावं.
- लिव्हरवर परिणाम झाल्यानं शरीरात अंतर्गत रक्तस्राव झाला
- इन्फेक्शनमुळे शरीरातील रक्त प्रचंड पातळ झालं

अनेक हॉटेलवाले चिकन बिर्याणीत शिळं मांसही वापरतात. आणि स्वस्तात बिर्याणी विकतात. त्यामुळे स्वस्त आणि मस्त अशा चमचमीत बिर्याणीवर ताव मारणं धोकादायक ठरू शकतं. मृत सचिननं ही बिर्याणी कुठून आणली होती ते कुणालाही माहित नाही आहे. त्यामुळे बिर्याणीवाल्याचा शोध घेऊन कारवाई करावी अशी मागणी कुटुंबीयांकडून होत आहे.

हे उदाहरण पाहून तरी उघड्यावरचं अन्न खाताना विचार करायला हवा. कारण, बिर्याणी स्वस्त मिळेल, मात्र जीव स्वस्त नाही. ग्राहकांच्या जीवाशी खेळणा-या अशा बिर्याणीवाल्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी. नाहीतर स्वस्तातली बिर्याणी सचिन सारख्या बिर्याणी शौकिनांचा जीव घेऊ शकते.