Pune Heavy Rain : भारतीय हवामान विभागाने (IMD) पुणे जिल्ह्यात 9 जुलै रोजी अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. अशातच पुणे जिल्ह्यात पुणे शहर, हवेली, आंबेगाव, खेड, जुन्नर, मावळ, मुळशी आणि भोर तालुक्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना 9 जुलै रोजी सुट्टी जाहीर करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे.
अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारची अनूचित घटना घडू नये तसेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊन त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होवू नये याकरीता वर नमूद तालुक्यातील 12 वी पर्यंतच्या सर्व शाळांना मंगळवारी सुट्टी राहील. तथापि, या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावं, असंही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
हवामान विभागाने राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी करण्यात आलं आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा आणि पुणे जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पालघर, ठाणे, रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी यांनी मुंबई महानगरातील सर्व व्यवस्थापनांच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच महाविद्यालयांना उद्या मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी सुटी जाहीर केली आहे.