कोकणातून कोल्हापूरला जात असाल तर फोंडा घाटातून जाऊ नका; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महत्वाची सूचना

कोकण आणि कोल्हापूरला जोडणारा फोंडा घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.. पर्यायी मार्गाचा वापर करा असं आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागानं केलंय. 

वनिता कांबळे | Updated: Jul 8, 2024, 11:13 PM IST
कोकणातून कोल्हापूरला जात असाल तर फोंडा घाटातून जाऊ नका; सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महत्वाची सूचना title=

Fonda Ghat Maharashtra : कोकणातून कोल्हापूरला जात असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण कोकण आणि कोल्हापूरला जोडणारा फोंडा घाट अवजड वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय.. पर्यायी मार्गाचा वापर करा असं आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागानं केलंय. त्यामुळे करूळ घाटानंतर आता फोंडाघाटही अवजड वाहनांना बंद राहणार आहे.. त्यासोबतच देवगड- निपाणी रस्त्यावरही अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलीय. रस्त्यावरील पाईप खचल्याने दुरूस्तीसाठी हा रस्ता बंद राहणार आहे.

आंबेरी पुलाला भलं मोठं भगदाड 

सिंधुदुर्गात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका आंबेरी मार्गाला बसलाय. कुडाळ इथल्या माणगाव खोऱ्यातील आंबेरी पुलाला भलं मोठं भगदाड पडलं.  हा मार्ग आता पूर्णतः बंद झालाय. नवीन बांधण्यात आलेला पुल अद्यापही वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नसल्याने आंबेरी मार्गावरील माणगाव खोऱ्यातील तब्बल 27 गावांचा येण्याजाण्याचा मार्ग बंद झालाय. नव्याने बांधण्यात आलेला पुल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करावा अशी मागणी स्थानिकांनी केलीय.

मुरुड अलिबाग मार्गावरील पुल खचला

मुरुड अलिबाग मार्गावरील चिकणी येथील पुल खचल्याने वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने सावधगिरी बाळगली आहे. हा पुल रात्री 10 ते सकाळी 6 या कालावधीत वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या वेळेत या पुलावरून वाहतूक करता येणार नाही. वाहन चालकांनी साळाव - सुपेगाव - मुरुड किंवा साळाव - रोहा - मुरुड या मार्गाने प्रवास करावा असे आवाहन रायगड जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. त्यामुळे वाहन चालकांना अलिबागवरुन मुरुडला जायचं असल्याचं मोठा वळसा मारावा लागणार आहे..

रायगड - अलिबाग पेण मार्गावरील वाहतूक ठप्प

रायगड - अलिबाग पेण मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. वाडगाव इथं भलामोठा वृक्ष रस्त्यावर कोसळला आहे. झाड कोसळल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली होती. आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली.  झाड बाजूला करून वाहतूक सुरू करण्यात आली. वाहतूक कार्लेखिंड कनकेश्वर फाटा मार्गे वळवण्यात आली.