कैलास पुरी, झी मिडिया, पिंपरी चिंचवड : कोरोनामुळे गेली दोन वर्ष मुलांना ऑनलाईन अभ्यास करावा लागला. पण यामुळे अगदी लहान वयात मुलांच्या हाती मोबाईल आले. याचा जितका फायदा होता त्यापेक्षा कितीतरी पटीने नुकसान पाहिला मिळतंय. तुमची मुलं काय करतात, मोबाईलवर काय बघतात, याकडे पालकांचं लक्ष असतं का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे पिंपरी-चिंचवडमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये एका 8 वर्षांच्या चिमुकल्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडलीय. कमल खेम साऊद असं आत्महत्या केलेल्या मुलाचं नाव आहे. कमलला मोबाईलवर हॉरर चित्रपट पाहण्याचा छंद होता. हॉरर चित्रपट पाहून कमलने हे कृत्य केल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
रविवारी दुपारी त्याची आई नेहमी प्रमाणे घरकामात व्यस्त होती. त्यावेळी कमल त्याच्या आवडत्या बाहुली बरोबर खेळत होता. एखाद्या कैद्याला फाशी देतात तसा त्याने बाहुलीच्या तोंडावर कपडा बांधला आणि तिला फाशी दिली. त्यानंतर कमलने त्याच पद्धतीने फाशी घेतली. यात त्याचा मृत्यू झाला.
घरातील कामं उरकल्यानंतर आई बाहेरच्या खोलीत आली, तेव्हा तिला धक्का बसला. या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत चौकशी केली तेव्हा मुलाला हॉरर चित्रपट पाहण्याची सवय असल्याची माहिती मिळाली. घटना घडील तेव्हा कमलजवळच त्याचा लहान भाऊ आणि बहिणी देखील खेळत होती.
लहान भावंडांची काळजी घेणारा आणि अभ्यासात हुशार असलेल्या कमलच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
कमलच्या आत्महत्येनंतर मुलांना काय दाखवतोय, मुले मोबाईल वर काय पाहतायत, त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतोय हे पाहणे किती महत्वाचे आहे हे पुन्हा अधोरेखित झालं आहे.