पुणे : घरातून बेपत्ता झालेल्या महिलेचा तिच्या फेसबुक फ्रेंडने खून केल्याची घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी आनंद निकम या आरोपीला अटक करण्यात आली आहे. महिलेच्या अंगावरील दागिने चोरण्याचा उद्देशानं त्याने हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे. मुंढवा परिसरात राहणारी एक ४२ वर्षीय महिला २२ जून रोजी मैत्रिणीसोबत शिर्डीला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडली होती. मात्र ती दोन दिवसांनंतरही घरी परतली नाही. त्यामुळे तिच्या मुलाने आई बेपत्ता असल्याची तक्रार मुंढवा पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. त्यानुसार पोलिसांनी तपास केला. महिलेच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची पोलिसांनी माहिती काढली. त्यातून या महिलेचे आनंद शिवाजी निकम या व्यक्तीशी संबंध असल्याची माहिती मिळाली.
आनंद हा २९ वर्षांचा असून पिंपरी-चिंचवड येथील काळेवाडीचा राहणारा आहे. तो चहा नाश्त्याचं छोटे हॉटेल चालवतो. त्याने या महिलेला फेसबुकच्या माध्यमातून आपल्या जाळ्यात ओढले होते. ते दोघे एकमेकांचे फेसबुक फ्रेंड होते. ते अधूनमधून भेटायचे. यावरून पोलिसांनी तपासाची दिशा त्याच्याकडे वळवली. त्यामध्ये आनंदनेच महिलेचा खून केल्याचे समोर आले. मुंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संपतराव भोसले यांनी त्याविषयी माहिती दिली.
'चौकशी दरम्यान आनंदकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे त्याच्यावरील संशय बळावला. त्याचप्रमाणे त्याच्या गाडीतून महिलेचा मोबाईल मिळाला आहे. आनंदावर दोन लाखांचे कर्ज आहे. ते फेडण्यासाठी त्याने हा कट रचला होता. ताम्हीणी घाटात फिरायला जाण्याच्या बहाण्याने त्याने महिलेला बोलावून घेतले. फोटोसेशन करूया असे सांगून महिलेला अंगावर भरपूर दागिने घालून यायला सांगितले. महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि दोघे ताम्हिणी घाटात गेले. तिकडे गेल्यावर आरोपी आनंद तिला निर्जन स्थळी घेऊन गेला. तिथे त्याने तिचे हातपाय बांधले आणि तिच्या अंगावरील दागिने काढून घेतले. दागिने घेऊन पसार होण्यापूर्वी त्याने तिचा निर्घृण खून केला"
आरोपीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर पोलिसानी मृत महिलेचा शोध घेतला. तिचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह घटनास्थळी आढळून आला आहे. महिलेच्या अंगावरील जवळ जवळ ७ तोळ्यांचे दागिने आरोपीने एका नातेवाईकाकडे ठेवले होते. आरोपीने त्याबदल्यात कर्ज फेडण्यासाठी पैसे घेतले होते. पोलिसांनी ते दागिने हस्तगत केले आहेत. घटना घडल्यानांतर तब्बल तीन आठवड्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. अटक करण्यात आलेला आरोपी आनंद निकम याला रविवारी न्ययालयात हजर करण्यात आले होते.
न्यायालयाने त्याला १६ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोशल मीडिया वरील मैत्री किंवा संबंध किती घातक ठरू शकतात हे यानिमित्ताने पुन्हा एकदा समोर आले आहे.