लाल मातीतच घेतला त्याने अखेरचा श्वास, पुण्यातील पैलवनाचा हृदयविकाराने मृत्यू

पैलवान बनण्यासाठी त्याने आयुष्यभर लाल मातीत कसरत केली. अनेक स्पर्धांमध्ये त्याने विरोधी मल्लांना धुळ चारली पण ज्या लालमातीत त्याने घाम गाळला त्याच लालमातीत त्याने अखेरचा श्वास घेतला. 

Updated: Mar 8, 2023, 04:48 PM IST
लाल मातीतच घेतला त्याने अखेरचा श्वास, पुण्यातील पैलवनाचा हृदयविकाराने मृत्यू title=

सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : पुण्यातून (Pune) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आयुष्य लाल मातीत घालवलेल्या पैलवानाचा शेवटही लाल मातीतच झाल्याची दुर्देवी घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील पैलवनाचा (Wrestler) हृदयविकाराने मृत्यू झाला. स्वप्नील पाडाळे (Swapnil Padale) असं पैलवानाचं नाव आहे. स्वप्नील अवघ्या 31 वर्षांचा होता.  स्वप्नील पाडाळे हा मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातील पैलवान होता. महाराष्ट्र चॅम्पियनचा (Maharashta Champion) खिताबही त्याने पटकावला होता.

आज सकाळी 7.30 वाजता पुण्यातील मारुंजी इथल्या कुस्ती तालमीत ही दुर्देवी घटना घडली. स्वप्नील हा नेहमी प्रमाणे सरावासाठी मारुंजी या ठिकाणी असलेल्या कुस्तीच्या तालमीत आला होता. कुस्तीसाठी सराव करताना पैलवानांना सपाट्या मारायच्या असल्यामुळे स्वप्नील देखील व्यायाम करत होता. व्यायाम करताना स्वप्निल अचानक कोसळला तो पुन्हा उठलाच नाही. 

स्वप्निला अचानक खाली कोसळल्याचं पाहाताच तालमितील इतर जणांनी त्याला उचललं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.पण त्याआधीच स्वप्निला मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्निलचा ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. स्वप्नीलने मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलनातून कुस्तीचे प्रशिक्षण घेतलं. त्यानंतर तो सध्या अनेक ठिकाणी मुलांना कुस्ती शिकवायचा. स्वप्नीलच्या आकस्मित मृत्यूमुळे कुस्ती खेळाच्या विश्वात शोककळा पसरली आहे.

पुण्यात अनेक तालमी आहेत. राज्यातील अनेक तरुण मुलं पुण्यात कुस्तीचे धडे घेण्यासाठी दाखल होत असतात. नामवंत वस्तादांचं मार्गदर्शन मिळत असल्याने अनेक मुलं कुस्ती खेळाकडे वळत आहेत. स्वप्निलही पुण्याच्या तालमीत घडला. इथेच त्याने कुस्तीचे धडे गिरवले आणि स्वत:ची ओळख निर्माण केली. पण स्वप्निलच्या अकाली निधनाने कुस्तीक्षेत्रावर शोककळा पसरली आहे. 

हार्ट अटॅकची लक्षणं कोणती ? 
आजच्या धकाधकीच्या जीवनात थकवा जाणवणं सामान्य असलं तरीही पुरेसा आराम करणं गरजेचं आहे. तुम्हांला सतत थकल्यासारखे वाटत असल्यास त्याकडे वेळीच लक्ष द्या.   

श्वास घेताना त्रास होणं हे हार्ट अटॅकचं मुख्य आणि महत्त्वाचं लक्षण आहे. श्वास घेताना त्रास जाणवत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका. 

डीहायड्रेशन किंवा धावपळीत खायला वेळ न मिळाल्याने चक्कर येते. मात्र चक्कर येण्याचं प्रमाण वाढल्यास काळजी घ्या. शरीरात ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने चक्कर येण्याचे प्रमाण वाढते. 

छातीत दुखणे हे देखील हृद्यविकाराचा धोका असल्याचे संकेत देतात. अनेकदा हृद्यविकार आणि अ‍ॅसिडीटी यांच्यामध्ये गल्लत होते.