खवळलेल्या समुद्रात 'ते' 20 तास, हेलिकॉप्टरमधून मदतीला आले देवदूत...सुटकेचा थरार

RGD ALIBAG RESCUE : रायगडच्या अलिबागमध्ये तब्बल 20 तास खवळलेल्या समुद्रात अडकून पडलेल्या खलाशांची तटरक्षक दलाच्या जवानांनी सुटका केली. भरकटलेल्या बार्जवर अडकलेल्या खलांशाची हेलिकॉप्टरच्या मदतीने थरारक सुटका करण्यात आली.

राजीव कासले | Updated: Jul 26, 2024, 09:22 PM IST
खवळलेल्या समुद्रात 'ते' 20 तास, हेलिकॉप्टरमधून मदतीला आले देवदूत...सुटकेचा थरार title=

प्रफुल्ल पवार, झी मीडिया, रायगड : खवळलेला समुद्र. समुद्रात उसळणाऱ्या उंचच उंच लाटा. भरकटलेला बार्ज. रात्रीचा काटाकुट्ट अंधार आणि भरकटलेल्या बार्जवर अडकून पडलेले JSW कंपनीचे 14 खलाशी. या 14 प्रवाशांसाठी काळ जवळजवळ नजीक येऊन ठेपला होता. मात्र तटरक्षक दलाचे जवान देवदूतासारखे धावून आले. हेलिकॉप्टरच्या मदतीनं त्यांनी बार्जवर अडकलेल्या 14 खलाशांची (Sailor) सुखरूप सुटका केली. आणि त्यांना नवं जीवनदान दिलं.

काय घडलं नेमकं?
JSW कंपनीचा मालवाहू बार्ज (Barge) गुरूवारी सकाळी धरमतर बंदरातून रत्नागिरीच्या (Ratnagiri) जयगडकडं निघाला. त्यावेळी आपल्यावर काय आपत्ती ओढवणाराय, याची कसलीच कल्पना या 14 खलाशांना नव्हती.

खवळलेल्या समुद्रात 'ते' 20 तास
दुपारच्या सुमारास अलिबागजवळ तांत्रिक बिघाड होऊन बार्ज बंद पडला. खराब हवामान, लाटांचा मारा आणि कमी दृश्यमानता यामुळं बार्ज भरकटला. कुलाबा किल्ल्याच्या मागील बाजूला जाऊन बार्ज स्थिरावला. बार्जवरील कप्तानानं ही माहिती कंपनीला दिली. आणि तिथून सुरू झाला सुटकेचा थरार. JSW कंपनी, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा कामाला लागली. जोरदार पाऊस आणि लाटांच्या मा-यामुळं बार्जपर्यंत बोट घेऊन जाणं शक्य नव्हतं.अख्खी रात्र या खलाशांनी जीव मुठीत धरून हेलकावे खाणाऱ्या बार्जवरच काढली. शुक्रवारी सकाळी तटरक्षक दलाची मदत घेण्यात आली. हेलिकॉप्टरच्या मदतीनं अखेर या 14 खलाशांची सुटका करण्यात आली
 
देव तारी त्याला कोण मारी, या म्हणीचा प्रत्यत्य यानिमित्तानं पुन्हा आला. सर्व यंत्रणांनी अथक प्रयत्न केल्यानंच सर्व खलाशांचे पाय सुखरूप अलिबागच्या किनाऱ्याला लागले. तब्बल 20 तास खवळलेल्या समुद्रात मृत्यूशी सुरू असलेली त्यांची झुंज संपली.  पुनर्जन्म मिळाल्याचे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होते.