Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा जोर कमी मात्र पूरस्थिती कायम, तळकोकणात जाणारा महत्त्वाचा मार्ग बंद

Raigad Rain Update: रायगडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. तीन नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Jul 25, 2024, 10:17 AM IST
Raigad Rain: रायगडमध्ये पावसाचा जोर कमी मात्र पूरस्थिती कायम, तळकोकणात जाणारा महत्त्वाचा मार्ग बंद title=
raigad savitri river school and college remain closed for today due to heavy rain

Raigad Rain Update: महाराष्ट्रात घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस होत आहे. पुणे, रायगड, कोल्हापूरात पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाले आहे. सखल भागात पाणी शिरण्यास सुरवात झाली आहे. रायगडच्या दक्षिण भागात मुसळधार पाऊस बरसत आहे. तर, तीन नद्यांनी धोका पातळी ओलांडली आहे. रायगड जिल्ह्या प्रशासनाने सतर्कतेचे आदेश दिले आहेत. तर जिल्ह्यातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.  रायगडला आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

रायगडमध्येही मुसळधार पावसामुळं जनजीवन विस्कळीत झाली आहे. महाडमध्ये सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्याचबरोबर, अंबा, कुंडलिका नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या नद्यांचे पाणी शहरात शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळं नगर प्रशासनाने भोंगा वाजवून नागरिकांने सतर्क केले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. पाली येथील अंबा नदी पुलाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावर पाणी आले आहे. त्यामुळं खोपोली वाकण महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. पाताळगंगा नदीच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. कर्जत , खालापूर भागात जोरदार पाऊस सुरू असून नेरळ ते दहीवली पुलावरून पाणी वाहू लागले आहे. पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला असून रोहा ते कोलाड मार्गावर पाणी साचले आहे. 

रायगडमध्ये या भागातील शाळांना सुट्टी जाहीर

महाड, पोलादपूर, माणगाव, तळा, रोहा , पोलादपूर तालुक्यातील शाळा , महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली होती. मात्र, जिल्ह्यातील गंभीर स्थिती पाहता आता सर्वच शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. 

 ताम्हिणी घाटात रस्त्यावर दरड कोसळली

रायगडमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं ताम्हिणी घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळं माणगाव ते पुणे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सध्या जेसीबीच्या सहाय्याने दरड हटवण्याचे काम सुरू आहे. माणगाव तहसीलदार पथकासह घटनास्थळी पोहोचले आहेत. ताम्हिणी घाटात कोसळलेल्या दरडीमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. माणगाव पुणे रस्त्यालगत असलेल्या धाब्यावर ही दरड कोसळली आहे. दरड बाजूला करण्याचे काम सुरू असून आणखी 4-5 तास लागणार आहेत. त्यामुळं माणगाव पुणे मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

रायगडमध्ये पावसाचा जोर कमी

रायगड जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी अनेक भागात पूरस्थिती कायम आहे. घाट माथ्यावरील लोणावळा, महाबळेश्वर , मुळशी भागात पावसाचा जोर कायम असल्याने पाणी पातळी वाढून स्थिती गंभीर होऊ शकते. म्हणून प्रशासन सतर्क आहे. महाड शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. दस्तुरी नाक्यावरून रायगडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी भरल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. व्यापाऱ्यांनी आवराआवर करून दुकाने बंद ठेवली आहेत. एनडीआरएफच्या पथकाने शहरातील परिस्थितीची पाहणी केली आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत.

रायगड जिल्ह्यातील नद्यांची पाणीपातळी

- महाड तालुक्यातील सावित्री नदीने धोका पातळी ओलांडली आहे. 

- रोहा तालुक्यातील अंबा नदीने ओलांडली धोका पातळी

- रोहा तालुक्यातील कुंडलिका नदीने ओलांडली धोका पातळी

- खालापूर तालुक्यातील पाताळगंगा नदी इशारा पातळीपेक्षा कमी 

- कर्जत तालुक्यातील उल्हास नदी इशारा पातळीपेक्षा कमी

- पनवेल तालुक्यातील गढी नदीची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा कमी असते.