धुळे : धुळे जिल्ह्यातल्या साक्री तालुक्यातील राईनपाडा सामूहिक हत्याकांडातील १० आरोपींना जामीन मंजूर करण्यात आलाय. १४ आरोपींनी जामीनासाठी अर्ज केला होता. मात्र इतर चौघांनी अर्ज मागे घेतल्यामुळे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं १० जणांना जामीन मंजूर केलाय. गेल्या वर्षी जुलै महिन्यात धुळे जिल्ह्यातल्या राईनपाडा गावात पाच जणांना गावकऱ्यांनी ठेचून मारलं होतं. त्यानंतर १४ आरोपींना अटक करण्यात आली होती. गेल्या वर्षभरापासून सर्व जण तुरूंगात होते. आरोपींनी कट करून नव्हे तर अफवेचे बळी ठरल्यामुळे हत्याकांड केल्याचा युक्तीवाद आरोपींच्या वकिलांनी केला.
सोलापूर जिल्ह्यातून भिक्षूकीसाठी भटकंती करणार्या पाच जणांना राईनपाडा गावात अक्षरक्षः दगडांनी, सळईने ठेचून ठार मारण्यात आले होते. भटक्या विमुक्त जमातीतील डवरी गोसावी समाजातील हे पाच भिक्षूक होते. या प्रकरणी सामूहिक हत्याकांडाचा गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात एकूण २८ जणांना अटक करण्यात आली होती.
यानंतर आरोपींनी धुळे सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. धुळे सत्र न्यायालयाने संशयितांचा जामीन अर्ज फेटाळला. यानंतर अॅड. राजेंद्र रघुवंशी यांच्यामार्फत आरोपींनी औरंगाबाद खंडपीठाच्या उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज सादर केला होता.