पावसाने रायगडात भातपिक, पुण्यात कांदा-टोमॅटो धोक्यात

 अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे.  

Updated: Oct 10, 2020, 09:23 PM IST
पावसाने रायगडात भातपिक, पुण्यात कांदा-टोमॅटो धोक्यात   title=

 रायगड / पुणे : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. पावसाने रायगडात भातपिक, पुण्यात कांदा-टोमॅटो पिक धोक्यात आले आहे. आज दुपारनंतर रायगड जिल्ह्याच्या सर्वच भागात कमी अधिक प्रमाणात परतीच्या पावसाने हजेरी लावली. 

राज्यात काही ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी

दक्षिण रायगडमधील महाड , पोलादपूर , माणगाव , म्हसळा या तालुक्यात विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. अनेक भागात वीज पुरवठाही खंडित झाला आहे . दुसरीकडे भातपिक कापणीच्या कामाला सुरुवात झाली असतानाच पावसाने हजेरी लावल्याने त्याचा फटका शेतीला बसण्याची शक्यता आहे.

पश्चिम महाराष्ट्रातही पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली. पुणे आणि कोल्हापुरात दुपारनंतर मुसळधार पाऊस झालाय. पुण्यात अचानक अंधारून आलं आणि तुफान पाऊस सुरू झाला. विजांच्या कडकडाटासह आलेल्या पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचल्याचे चित्र आहे. 

उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड तालुक्याला आज वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊसाने झोडपले. गेली आठवडाभरापासून विश्रांती घेतलेल्या पाऊसाने आज जोरदार कमबॅक केले. तीन तास झालेल्या पाऊसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकतीच लागवड झालेली कांदा टोमॅटो यांसारखी पिके धोक्यात आली. शेतात पाणी साचून कांदा रोप शेतातच सडू लागले आहे. आधीच कोरोनाच्या संकटाने हतबल झालेल्या बळीराजा शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली.