पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी (Mns Chief Raj Thackeray) गुढीपाडवा मेळाव्यातील सभेत मशिदीवरील भोंगे उतरविले नाही तर स्पीकरवर हनुमान चालिसा लावण्याचे आदेश दिले होते.
राज ठाकरे यांच्या या आदेशानंतर घाटकोपर, कुर्ला येथे मनसैनिकांनी हनुमान चाळीस वाजविली. परंतु, पुणे मनेसे शहराध्यक्ष आणि नगरसेवक वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. थेट, मनसे प्रमुखांच्या भूमिकेचा विरोध केल्यामुळे त्यांच्यावर काय कारवाई होणार याकडे मनसैनिकांचे लक्ष लागले होते.
दरम्यान, राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना शुक्रवारी मुंबईतील 'शिवतीर्थ' (Raj Thackeray Home) निवासस्थानी बोलावलं होतं. मात्र, ही भेट होण्यापूर्वीच वसंत मोरे यांची पुणे मनसे शहराध्यक्ष पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. पुणे शहर अध्यक्ष म्हणून वसंत मोरे यांच्या जागी आता नगरसेवक साईनाथ बाबर यांची नियुक्ती करण्यात आलीय.
दरम्यान, पुणे शहरात वसंत मोरे यांच्या हकालपट्टीनंतर मनसेला शहरात अजून एक मोठा धक्का बसलाय. राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेचे शहराध्यक्ष निलेश माझिरे व त्यांचे समर्थक पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याचे समजते.