22 जानेवारीला महाराष्ट्रातील 'या' शहरात चिकन, मटणची दुकानं बंद राहणार

Pune : उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत  22 जानेवारीला रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा केली जाणार आहे. या सोहळ्यानिमिताने देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. देशातील काही राज्यात 22 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. 

अरूण म्हेत्रे | Updated: Jan 18, 2024, 05:14 PM IST
22 जानेवारीला महाराष्ट्रातील 'या' शहरात चिकन, मटणची दुकानं बंद राहणार title=
संग्रहित फोटो

Pune : अयोध्येतील राममंदिराच्या गर्भगृहात आज रामलल्लाची मूर्ती स्थापित करण्यात आली असून 22 तारखेला प्राण प्रतिष्ठा (Ram Mandir Pran Pratishta) केली जाणार आहे. संपूर्ण देशात या सोहळ्याची उत्सुकता असून अयोध्या (Ayodhya) राममय झाली आहे. या निमित्ताने उत्तप्रदेश, मध्यप्रदेश, गोवा, छत्तीसगड या राज्यात सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातही या दिवशी सुट्टी जाहीर करावी अशी मागणी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात (Pune) 22 तारखेला चिकन, मटणची दुकानं पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

पुणे शहर कुरेशी समाजातील मटण आणि चिकन विक्री दुकाने तसंच सर्व व्यवहार बंद करून, प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त लाडू आणि पेढे वाटप करुन या उत्सवात सहभागी होणार आहेत.  कुरेशी समाजाच्या वतीने हे जाहीर करण्यात आलं आहे . 22 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामाचा प्राण प्रतिष्ठा सोहळा साजरा होणार आहे.  अयोध्येमधील रामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळयाचा आनंद आणि उत्साह देशभर साजरा केला जात आहे. यासाठी ऑल इंडिया जमीयतुल कुरेश एक्शन कमेटीच्या वतीने 22 जानेवारीला सर्व व्यवहार बंद करून या कार्यक्रमात आनंद उत्साहाने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती कुरेशी समाजाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सादिक कुरेशी  यांनी दिली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची सुट्टी
दरम्यान 22 जानेवारीला संपूर्ण देशात अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सकाळपासून दुपारी 2.30 पर्यंत देशभरातील सरकारी कार्यालयं आणि शाळा-कॉलेजमध्ये अर्ध्या दिवसाची सुट्टी असणार आहे. अयोध्येतील प्राण प्रतिष्ठेचा सोहळा लोकांना पाहाता यावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या सर्व कार्यालयात अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी दिलीय. देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. त्यामुळे या सोहळ्यात सर्वांना सहभागी होता यावं यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं जितेंद्र सिंह यांनी सांगतिलं. 

अयोध्येतील राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाचे मुख्य यजमान पंतप्रधान नरेंद्र मोदी असणार आहेत, पंडित लक्ष्मीदास दीक्षित यांनी ही माहिती दिली आहे. 22 जानेवारीला प्राण प्रतिष्ठा सोहळ्याआधी पीएम मोदी यांनी 11 दिवासांचा अनुष्ठान ठेवलं आहे. आज पीएम मोदी यांनी शरयू नदीच्या तटावर कलश पूजन केलं. दरम्यान, राममंदिराच्या गर्भगृहात आज रामलल्लाची मूर्ती स्थापित करण्यात आली.