Ayodhya Ram Temple: 22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी? शाळा बंद राहणार की सुरु?

सध्या देशात अयोध्या राम मंदिरातील प्राणप्ततिष्ठा सोहळ्याचा उत्साह आहे. 22 जानेवारीला हा कार्यक्रम होणार असून, अनेक राज्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.    

शिवराज यादव | Updated: Jan 18, 2024, 04:11 PM IST
Ayodhya Ram Temple: 22 जानेवारीला महाराष्ट्रात सुट्टी? शाळा बंद राहणार की सुरु?  title=

सध्या देशात अयोध्या राम मंदिरातील प्राणप्ततिष्ठा सोहळ्याचा उत्साह आहे. 22 जानेवारीला हा सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आणि अनेक व्हीव्हीआयपी उपस्थित असलेल्या भव्य समारंभाला 22 जानेवारीला सुरुवात होणार आहे. विश्वस्त मंडळाने सर्व उपस्थितांचे स्वागत आणि सन्मान करण्यासाठी व्यवस्था उभारली आहे. त्यांना विशेष भेटवस्तू दिल्या जाणार आहेत. 22 जानेवारीला रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचे प्राथमिक विधी लक्ष्मीकांत दीक्षित यांच्या नेतृत्वाखालील पुजाऱ्यांच्या टीमकडून केले जाणार आहेत. अतिथींसाठी स्मृतिचिन्ह म्हणून मंदिरातील पूज्य रामराज मातीचे सादरीकरण हे एक ठळक वैशिष्ट्य आहे. ही पवित्र देणगी, दैवी कृपेचे प्रतीक आहे, याचा उपयोग घरगुती बागेत किंवा फुलांच्या कु़ंड्यात केला जाऊ शकतो. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नसलेल्यांनाही ही भेट मिळणार आहे.

दरम्यान या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. जाणून घ्या त्यांची यादी 

उत्तर प्रदेश

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानुसार, 22 जानेवारीला राम मंदिर 'प्राणप्रतिष्ठा' सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशातील शैक्षणिक संस्था बंद राहणार असल्याचं वृत्त, एएनआयने दिलं आहे. याशिवाय त्या दिवशी राज्यभरात दारूची दुकाने बंद राहणार आहेत.

मध्य प्रदेश

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मध्य प्रदेशात 22 जानेवारीला शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. तसंच लोकांना हा दिवस एखाद्या सणासारखा साजरा करण्यास सांगितलं आहे. मोहन यादव यांनी 22 जानेवारीला राज्यात दारू आणि भांग विक्रीच्या दुकानांसह सर्व प्रकारची दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

गोवा

गोवा सरकारने 22 जानेवारीला सर्व सरकारी कर्मचारी आणि शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितलं आहे की, शाळांसह सरकारी कर्मचाऱ्यांना सार्वजनिक सुट्टी असणार आहे. 

छत्तीसगड

छत्तीसगड सरकारने 22 जानेवारीला राज्यातील सर्व सरकारी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. मुख्यमंत्री विष्णू देव साई यांनी सोशल मीडियाद्वारे ही घोषणा केली.

हरियाणा

हरियाणा सरकारनेही राम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर 22 जानेवारीला शाळा बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. तसेच, अभिषेक सोहळ्याच्या दिवशी राज्यात कुठेही मद्यपान करण्यास परवानगी दिली जाणार नाही.

महाराष्ट्राचं काय?

राज्यातील आमदार सत्यजीत तांबे यांनी 22 जानेवारीला अयोध्येतील सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर करण्याची मागणी केली आहे. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांना पत्र लिहिलं आहे. सर्व शासकीय, निम-शासकीय कार्यालयं; शाळा, कॉलेज यांना सुट्टी जाहीर करावी अशी विनंती करण्यात आली आहे. 

22 जानेवारीला अनेक लोक रस्त्यावर उरतलील, ज्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होऊ शकते. या पार्श्वभूमीवर सुट्टी जाहीर केल्यास विद्यार्थ्यांना अडचण होणार नाही असंही ते म्हणाले आहेत. 

महाराष्ट्र सरकारने अद्याप यासंबंधी निर्णय घेतलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना एखाद्या सणाप्रमाणे हा दिवस साजरा करा असं आवाहन केलं आहे.